आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराट्रकचालकाचे हात-पाय बांधून त्याला उसात टाकून १२ टन स्टीलचा ट्रक घेऊन पळालेल्या आरोपींपैकी एकाला ट्रकसह मोहोळ पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने २४ तासात परंडा तालुक्यातील येणेगाव येथून ताब्यात घेतले असून अन्य आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती मोहोळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक सायकर यांनी दिली.
पोलिस सूत्रांनुसार : काचेवर आलेली ताडपत्री बांधण्यासाठी व लघुशंकेसाठी रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ट्रक चालक प्रवीण सरगर रा. जत याला बंदुकीचा व तलवारीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत जवळच्या ऊसात नेऊन त्याचे हातपाय बांधून स्टीलने भरलेला ट्रक (क्र.एमएच १० झेड १३५२) व चालकाच्या खिशातील रोख रक्कम असा एकूण १३ लाख ६१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पळवून नेल्याची घटना ४ जून रोजी पहाटे सव्वा तीनला शेटपळजवळ घडली होती. याप्रकरणी अज्ञात ६ जणांच्या विरोधात मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक हिम्मतराव जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळचे पोलीस निरीक्षक अशोक सायकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डूणगे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने माहिती घेतली. एका खबर्याने दरोड्यातील पळवून आणलेला ट्रक स्टीलसह परंडा तालुक्यातील येणेगाव शिवारात निर्जन ठिकाणी लावला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार मोहोळ पोलिस ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या पथकातील पोलिस कर्मचाऱ्यांनी सापळा रचून १३ लाख १० हजार रूपये मुद्देमालाचा ट्रक व ट्रक सोबत असलेल्या संशयित आरोपीला ताब्यात घेतले. मोहोळ पोलीस पथकातील गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी २४ तासाच्या आत मुद्देमाल व एका संशयिताला ताब्यात घेतले.
अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे करीत आहेत. तपासाच्या दृष्टिकोनातून ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव गोपनीय ठेवण्यात आले आहे. या प्रकरणातील आणखी संशयित आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. लवकरच अन्य आरोपींना अटक करण्यात येईल. अशोक सायकर, पोलिस निरीक्षक, मोहोळ पोलिस ठाणे
खबऱ्यामुळे ट्रक ताब्यात
चोरीचा ट्रक व त्यातील मुद्देमाल कोणाला दिसु नये म्हणुन चोरट्यांनी रस्त्यापासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर एका वस्तीजवळ लोकवस्ती नसलेल्या ठिकाणी लावला होता. परंतु मोहोळ पोलिसांच्या पथकाला खबऱ्याने दिलेल्या योग्य माहितीच्या आधारे नेमक्या ठिकाणी पोहोचल्यामुळे ट्रक व एक संशयित हाती लागला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.