आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्तनपान करा, कॅन्सरपासून दूर रहा:जागतिक स्तनपान दिनानिमित्त तज्ज्ञांचे महिलांना आवाहन

प्रतिनिधी । सोलापूर6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मातेने बाळाला केलेले स्तनपान हे सर्वश्रेष्ठ असते. त्यामुळे बाळाला शक्ती तसेच त्याची रोगप्रतिकारशक्ती वाढतेच पण स्तनपान केल्यामुळे स्त्री स्वतः कॅन्सरच्या धोक्यापासून दूर राहते. त्यामुळे स्तनपान करा आणि कॅन्सरपासून दूर रहा, असा सल्ला डॉ. लता पाटील मीठाकोळ यांनी दिला.

जागतिक स्तनपान दिनानिमित्त इनरव्हील क्लब ऑफ सोलापूर स्टारलेट, बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी सोलापूर, फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखा व साथी या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने अक्कलकोट रोड येथील गांधीनगर नंबर ७ येथील पोशम्मा देवस्थानमध्ये जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सध्या स्तनपानाकडे दुर्लक्ष

यावेळी डॉ. लता म्हणाल्या की, स्तनपान करणे भारतीय संस्कृतीला अनमोल देणं आहे. सध्या याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मात्र, तसे न करता मातांनी स्तनपान करण्यावर भर दिला पाहिजे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फॅमिली प्लॅनिंगच्या कार्यकारी सदस्य प्रा. डॉ. विजया महाजन होत्या. त्यांनी सांगितले, डिलिव्हरी झाल्यानंतर बाळाला आईपासून दूर न ठेवता तिच्या जवळ ठेवल्यास दोघांमध्ये बाँडींग तयार होण्यास मदत मिळते. आईचे दूध डिलिव्हरी झाल्या झाल्या बाळाला द्यावे, त्यामुळे बाळ व आईमध्ये स्नेह निर्माण होऊन दूध ग्रंथी कार्यशील होतात. त्यामुळे दूध तयार व्हायला लागते. नियमित स्तनपान केल्याने बाळाला रोगप्रतिकारशक्ती मिळते. बाळाचे वजन वाढते व ते निरोगी राहते. नियमित स्तनपान केल्याने आईलाही त्याचे फायदे मिळतात स्तनामध्ये गाठी निर्माण होणे, स्तनाचा व गर्भाशयाचा कॅन्सर होणे आदींची शक्यता कमी होते असे मत व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...