आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Solapur
  • Facility Of 4700 ST Buses Available For Warakaris For Ashadi Wari Yatra; Construction Of Yatra Bus Stands At 4 Places In Pandharpur Is In Full Swing |marathi News

वेध वारीचे:आषाढी वारी यात्रेसाठी 4700 एसटी बसेसची सुविधा वारकऱ्यांना उपलब्ध; पंढरीत 4 ठिकाणी यात्रा बसस्थानके उभारणीचे काम वेगात

पंढरपूर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना महामारीमुळे दोन वर्षांनंतर होत असलेल्या आषाढी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाने ४ हजार ७०० विशेष बसेस ची सोय केलेली आहे. पंढरपूर येथे शहराच्या चारही दिशांना ४ यात्रा बसस्थानकांची उभारणी करण्यात येत आहे.

आषाढी यात्रेसंदर्भात मंगळवारी येथे राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीस एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्यासह भांडार, वाहतूक, यंत्र आणि अभियांत्रिकी विभागाचे सरव्यवस्थापक आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

यावेळी आषाढी यात्रेसाठी विभागवार येणाऱ्या भाविकांची संख्या, त्यासाठी उपलब्ध कराव्या लागणाऱ्या बसेसचा आढावा घेण्यात आला. दोन वर्षानंतर आषाढी यात्रा होत असल्याने यंदा भाविकांची संख्या वाढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. सर्व अधिकारी यांनी चारही बसस्थानकांची पाहणी करून कामाचा आढावा घेतला. त्यानुसार यात्रेसाठी ४७०० गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. औरंगाबाद विभागातून १२००, मुंबई विभाग ५००, नागपूर विभाग १००, पुणे विभाग १२००, नाशिक विभाग १००० तर अमरावती विभागातून ७०० विशेष यात्रा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.

दरवर्षी प्रमाणेच यंदाही प्रवाशांच्या सोयीसाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भीमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज, सांगोला रोड) व विठ्ठल सहकारी साखर कारखाना या चार ठिकाणी तात्पुरती यात्रा बसस्थानक उभारण्यात येणार आहेत. या ठिकाणी पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक अशा विविध सोयी-सुविधा पुरविण्यात येणार आहेत.

याप्रमाणे आहे नियोजन
भाविकांसाठी पुढीलप्रमाणे बस स्थानके व जिल्हानिहाय सोडण्यात येणारे नियोजन पुढीलप्रमाणे आहे. पंढरपूर आगार आणि चंद्रभागा बसस्थानक येथे मुंबई, ठाणे, रायगड, सातारा, पुणे विभाग आणि सोलापूर रोड लगत सूतगिरणी मैदानात भीमा बसस्थानकात औरंगाबाद, नागपूर व अमरावतीचे बस थांबतील. विठ्ठल कारखाना बसस्थानकात नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर विभाग, आयटीआय कॉलेजजवळ पांडुरंग बसस्थानकात सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग विभागातील बसेस थांबणार आहेत.

प्रवासी सुविधा आणि बसेसची संख्या यावर चर्चा झाली
मंगळवारी राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्यासह वरिष्ठ अधिकारी पंढरपूर मध्ये बैठकीला उपस्थित होते, त्यांनी शहरातील चारही नियोजित यात्रा बसस्थानकाची जागेवर जाऊन पाहणी केली. त्यानंतर प्रवासी सुविधा, बसेसची संख्या यावर चर्चा झाली.''
विलास राठोड, सोलापूर विभागीय नियंत्रक, रा. परिवहन महामंडळ

बातम्या आणखी आहेत...