आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:पहिल्या प्रयत्नात अपयश, निराश‌ न होता लढत राहिले ; पोलिस अधीक्षक सातपुते यांनी सांगितली यशाची कहाणी

सोलापूर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मी २००९-१० मध्ये लॉ कॉलेजला पुण्यात शिकत होते. पुण्यात आल्यावर मला कळले की यूपीएससी-एमपीएससी परीक्षा असतात. २०१० साली मी यूपीएससीची पहिली ( प्रिलियम) परीक्षा दिली. त्यात अपयश आले. २०११ साली दुसऱ्यांदा परीक्षा दिली आणि २०१२ ला रिझल्ट आला, मी यशस्वी झाले. पहिल्या प्रयत्नात नापास झाले म्हणून तो विषय सोडला नाही. जिद्दीने त्याकडे पाहत राहिले, अभ्यास केला. दिवाळी सुटीत पाणी आणि बिस्कीट खाऊन अभ्यास केला. खचून गेले नाही, निराश झाले नाही, आशा सोडली नाही. नापास होणं म्हणजे अयशस्वी होणे नाही. नवीन शिकण्यासाठी या काळाला समोरे गेले पाहिजे. आलेले अपयश प्रेरणा देणारे आहे असे समजा, असा सल्ला पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिला आहे. बारावीचा निकालाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला. मी मूळची नगर जिल्ह्यातील आहे. २००५-०८ ला बीएससी बायोटेक्नॉलॉजी पदवी घेतली. नंतर एमस्सी सोडून पुण्यात लॉ महाविद्यालयात प्रवेश घेतला. यावेळी कळाले की, यूपीएससी परीक्षा असतात. त्यासाठी अभ्यास केला, फॉर्म भरला आणि पहिल्याच प्रयत्नात अपयशी ठरले. पुढच्या वर्षी पुन्हा जोरदार अभ्यास केला आणि पास झाले. खूप गुण मिळाले, पुस्तकी हुशार म्हणजे यशस्वी व्यक्ती असं नाही. प्रत्येक जण कुठल्या तरी एका क्षेत्रात हुशार असतो. चित्रकला, गायन, खेळ किंवा अन्य कुठल्याही क्षेत्रात आवड असते. यात करिअर करू शकता. ज्या क्षेत्रात आवड आहे‌ त्यात काम करा.

मोठी टक्केवारी म्हणजे यश नाही खूप टक्केवारीने मार्क पडले तरच ती व्यक्ती हुशार आहे, असं समजू नका. हा गैरसमज आहे. तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे, प्रत्येक विषयाकडे कसं पाहता, त्यावर कसा फोकस करता , त्यावर काम करता, हा विचार महत्त्वाचा आहे. नापास झाल्यानंतर पुन्हा प्रयत्न करा, अभ्यास करा. जीवनातला आनंद हरवू देऊ नका, जिद्दीने पुढे जा, नापास होणं म्हणजे सर्वकाही संपलं असं नव्हे. टॉपमध्ये काम करण्याचा प्रयत्न करा. यश तुमचेच आहे, असे पोलिस अधीक्षक सातपुते सांगतात.

बातम्या आणखी आहेत...