आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअल्पशा आजाराने वडिलांचे सकाळी ८ वाजता निधन झालेले असताना मुलाने आपले दु:ख बाजूला सारून आधी पेपर दिला. बारावीचा पेपर दिल्यानंतर दुपारी साडेतीनच्या सुमारास वडिलांच्या चितेला भडाग्नी दिला. ही घटना तालुक्यातील हुलजंती येथे घडली आहे. एकीकडे आनंद तर दुसरीकडे दु:ख अशी वेळ मुलासह कुटुंबीयांवर आल्याचे ग्रामस्थही हळहळले.
हुलजंती येथील कल्लाप्पा आबा रूपटक्के (६०) यांचे अल्पशा आजाराने शुक्रवारी सकाळी ८ वाजता निधन झाले. रुपटक्के यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची असून मुलगा तुकाराम हा एम.पी मानसिंगका विद्यालय सोडडी येथे बारावीच्या वर्गात शिकत आहे. त्याचा शुक्रवारी गणिताचा पेपर होता. मात्र, वडिलांचा मृत्यू झाल्याने मुलाला पेपर देता येणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी निर्णय घेऊन मुलाने आधी पेपर द्यावा आणि नंतर अंत्यसंस्कार करावे, असा निर्णय घेतला. मुलाने जड अंत:कराने वडिलांचे अंत्यदर्शन घेऊन घर सोडून परीक्षा केंद्रावर जाऊन पेपर दिला. १०:३० ते २:१५ या वेळेत पेपर देऊन आल्यानंतर दुपारी ३:३० च्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत बोलताना त्याच्या महाविद्यालयाचे प्राचार्य बसवराज कोरे म्हणाले, आमच्या प्रशालेतील इयत्ता बारावी विज्ञान शाखेतील तुकाराम या विद्यार्थ्याच्या वडिलांचे सकाळी निधन झाले. आज बारावी गणिताचा पेपर असून वडिलांचा मृतदेह घरामध्ये ठेवून तो पेपरला हजर झाला. हालाखीच्या परिस्थितीमध्ये दुःखावर मात करून परिस्थितीशी कसा संघर्ष करावा या विद्यार्थ्याच्या धाडसी वृत्तीची कौतुक करावे तेवढे कमीच आहे.
पोलिस अधिकारी होण्याचे वडिलांचे स्वप्न पूर्ण करणार
तुकारामच्या वडिलांचे अल्पशा आजाराने निधन झाल्यामुळे त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती बिकट असून आई मूकबधिर आहे. जवळचे कोणीही नातेवाईक नाहीत. त्यामुळे गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन अंत्यसंस्कार केले. मी पोलिस अधिकारी व्हावे असे वडिलांचे स्वप्न होते. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी नातेवाईकांनी मला पेपर देण्यास सांगितले. आता वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न कणार असल्याचे तुकाराम म्हणाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.