आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:समाजाने वाळीत टाकल्यामुळे नागणसूर गाव सोडलेला तरुण बनला फौजदार

अक्कलकोट6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बसवराज हर्डीकर एमपीएससीत राज्यात एससीमध्ये 19 वा

घरात अठराविश्व दारिद्र्य, भाकरीसाठी आईची तडफड, लहानपणीच वडिलांचे छत्र हरपलेले, मोठा भाऊ दारूच्या आहारी गेलेला आणि त्यातून कुटुंबात सतत वाद व्हायचे. आईची किडनी निकामी झाल्याने चिंता सतावत होती. त्यातच मोठ्या भावाचा त्रास आणि अनुसूचित समाजाने वाळीत टाकले. त्यामुळे बसवराज गुंडप्पा हर्डीकर (रा. नागणसूर) हा घरदार सोडून दुधनी येथे बहिणीकडे गेला. नोकरी लागल्याशिवाय गावात पाय न ठेवण्याच्या निश्चयाने बाहेर पडलेला बसवराज हा राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत १९ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली. विशेष म्हणजे त्याने १२ वर्षे गावाचेही तोंड पाहिले नाही.

शिक्षणाशिवाय पर्याय नसल्याचे जाणून बसवराज दहावी चांगल्या गुणाने उत्तीर्ण झाला. त्यानंतर तो सोलापूरच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिकला. नंतर डिप्लोमा करत बी. ए. केले. त्यानंतर पुन्हा तो बहिणीकडे दुधनीत आला. तेव्हा पोलिस खात्यात कार्यरत वीरभद्रप्पा कोलाटी यांची भेट झाली. आपणही पोलिस व्हावे, असे बसवराजला वाटले. त्यामुळे त्याने पुणे गाठले. तेथे बालविकास कार्यक्रम अधिकारी धनराज गिरम यांची भेट झाली. गिरम व बसवराज या दोघांची कहाणी एकच होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बसवराजने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. अभ्यास करण्यासाठी जागा नसल्याने मठाचा आधार घेतला. दिवसरात्र अभ्यास सुरू केला. अत्यंत हलाखीची परिस्थिती व गरिबीची जाणीव ठेवली. समाजाने वाळीत टाकलेल्या दुःखाचा कधी विसर पडू दिला नाही. त्याने एमपीएससी परीक्षेत अनुसूचित जाती प्रवर्गात राज्यात १९ वा क्रमांक मिळवला. जिद्द व चिकाटी असल्यास काहीही साध्य करू शकतो, हे बसवराज हर्डिकरने दाखवून दिले आहे.

माझ्या बहिणीच्या वाट्याला दारिद्र्य, दुःख व गरिबी होती. शिक्षणासाठी बसवराज माझ्याकडे होता. हलाखीच्या परिस्थितीत त्याने यश मिळवले. माझ्या बहिणीने भोगलेल्या दुःखांना आज त्याने वाट मोकळी करून दिली.'' खाजप्पा मानकर, बसजराजचा मामा, दुधनी

गरिबी पाचवीला पूजलेली होती. समाजाने वाळीत टाकल्याने अधिकारी होऊनच गावी जाईन, असा चंग बांधून मी अभ्यास केला. आई, बहीण, मामा व मित्रांचा खूप मोठा आधार लाभला. '' बसवराज हर्डीकर, एमपीएससी उत्तीर्ण

शिक्षणासाठी पाच हजार रुपये कमी पडले होते. मंगळसूत्र गहाण ठेवून बसवराजला पैसे दिले. तो पोलीस अधिकारी झाला, याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.'' लक्ष्मीबाई हर्डीकर, बसवराजची आई

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी सामना, संघर्ष करत बसवराज घडला. उच्च विचार व अभ्यासात हुशार असल्याने त्याला यश मिळाले. त्याचे खूप समाधान वाटत आहे.'' वीरभद्रप्पा कोलाटी, पोलिस नाईक, दुधन

बातम्या आणखी आहेत...