आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकास आराखडा:पंढरपूर विकास आराखडा अंतिम करताना परिपूर्ण करा : उपमुख्यमंत्री

पंढरपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर तीर्थक्षेत्र विकासासाठी सर्वोत्तम नियोजन करा. वारकरी, भाविकांना व स्थानिक नागरिकांना पायाभूत सुविधा मिळाव्यात, या दृष्टीने संबंधितांनी प्रारूप आराखडा अंतिम करताना सर्वंकष, परिपूर्ण होण्यासाठी प्रयत्न करावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथील बैठकीत केल्या. त्याचवेळी या आराखड्यामुळे भूसंपादन करताना निकषाच्या बाहेर जाऊन बाधितांचे पुनर्वसन करण्यात येईल, असेही सांगितले.

पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून श्री. फडणवीस बोलत होते. पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या या बैठकीस महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार समाधान आवताडे, आमदार बबनराव शिंदे, आमदार राम सातपुते, आमदार शहाजीबापू पाटील, आमदार सुभाष देशमुख, माजी आमदार प्रशांत परिचारक, विभागीय आयुक्त सौरभ राव, कोल्हापूर परिक्षेत्र पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आराखड्याचे सादरीकरण केले.

श्री. फडणवीस म्हणाले, भूसंपादनासाठी आवश्यक जमिनीची मोजणी करून प्रस्ताव तयार करावा. स्थानिकांचे पुनर्वसन करताना ज्यांचा व्यवसाय आहे त्यांना तिथेच प्राधान्याने जागा देऊ. रहिवाशांना बहुमजली इमारतीत घरे आणि मोकळा प्लॉट किंवा भरीव नुकसान भरपाई देण्याचा विचार करण्यात येईल. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधींनी नागरिकांशी चर्चा करून पंढरपूरचा चांगला विकास करण्यासाठी सुवर्ण मध्य साधावा.

बातम्या आणखी आहेत...