आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाळ्यात सर्पदंशाची भीती:मुसळधार पावसानंतर सोलापूरमध्ये दोन ठिकाणी घरात आढळले नाग, सर्पमित्रांनी केली सुटका

सोलापूर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनिवारी पावसानंतर नागराज नगर येथे एका घराच्या अंगणात तीन फूट लांबीचा मोठा नाग आढळला. - Divya Marathi
शनिवारी पावसानंतर नागराज नगर येथे एका घराच्या अंगणात तीन फूट लांबीचा मोठा नाग आढळला.

सोलापूर शहर परिसरात शनिवारी मुसळधार पाऊस झाला. रात्री पावसानंतर नागराज नगर येथे एका घराच्या अंगणात तीन फूट लांबीचा मोठा नागाच्या फुत्काऱ्याच्या आवाजाने घरातील लोक घाबरले. सर्प मित्रांनी त्वरित तो नाग पकडून त्याला निसर्ग अधिवासात मुक्त केले. दुसरी अशीच घटना वसंत विहार येथे घडली.

बाळे येथील नागराज नगरमध्ये सुरेश मोटे यांच्या घरात शनिवारी रात्री नागाची ही थरारक घटना घडली. शनिवारी रात्री आठ वाजता मुसळधार पावसाला सुरुवात झाली. तास-दीड तासाच्या पावसानंतर घराच्या अंगणात पाणी थांबले होते. पाण्याचा निचरा झाल्यानंतर चप्पल ठेवण्याच्या स्टँडमध्ये एक भला मोठा नाग बसला होता. अंगणात त्या कुटुंबातील सदस्यांच्या पायाची चाहूल लागताच फणा काढून नागाने जोरदार फुत्कार केला. बॅटरी लावून पाहिले असता मोठा नाग फणा काढून उभा असल्याचे कुटुंबीयांना दिसले. भयभीत झालेल्या कुटुंबाने वाइल्डलाइफ कंजर्वेशन असोसिएशनच्या सदस्यांना त्या घटनेची माहिती दिली. सर्पमित्र सुरेश क्षीरसागर घटनास्थळी दाखल झाले. दरवाजाच्या बाजूला एका चप्पलमध्ये त्यांना तीन फुट लांबीचा विषारी साप दिसून आला. क्षीरसागर यांनी अलगद एका बॉक्समध्ये बंद करून त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.

वसंत विहारमध्ये ५ फुटांचा नाग

वसंत विहारमधील संकेत नगर येथील निवासी विलास शिंदे यांच्या घरात सुमारे ५ फुटांचा नाग आढळून आला. नॅचरल ब्लु कोब्रा संस्थेचे अध्यक्ष अनिल अलदार यांना घटनेची माहिती कुटुंबीयांनी दिली. घटनेची माहिती मिळताच अलदार यांनी त्वरित घटनास्थळी पोहोचूनय शिताफीने या नागास पकडले. लोकांच्या मनातील प्रश्नांना उत्तरे देत, भिती दूर केली.

आला पावसाळा, सर्पदंश टाळा

पावसाळ्याची सुरुवात होताच जमिनीत असलेल्या सापांच्या निवासस्थात पावसाचे पाणी शिरल्यामुले साप जमिनीबाहेर पडतात. कोरड्या जागेच्या शोधात अथवा भक्ष्याच्या शोधात घरात किंवा कंपाऊंडमध्ये शिरतात. अशा वेळी सर्पदंशाची शक्यता अधिक असते. त्यामुळे खबरदारी म्हणून पावसाळ्यात बुट वापरणे, शुज पायात घालताना खबरदारी घेणे, अडगळीच्या ठिकाणी हात घालायचे टाळणे, लाईटवरील किडे खाण्यासाठी येणाऱ्या पाली आणि बेडकांच्या शोधात येण्याची सापांची शक्यता असल्याने बाहेर निघताना काळजी घेणे, यासारखी जुजबी खबरदारी घेतली तर दुर्घटना टळू शकते, असे सर्पमित्रांनी सांगितले.

साप निघाल्यास काय कराल?

- साप घरात आढळल्यास न घाबरता शांत रहा. सर्पमित्र किंवा वनविभागाच्या १९२६ या टोल फ्री क्रमांकावर फोनकरून तात्काळ संपर्क करावा.

- त्याच्या हालचालीकडे बारकाईने लक्ष द्या.

- सापाजवळ जाण्याचा अथवा छायाचित्र काढण्याचा प्रयत्न करु नये.

नागराज नगर येथे एका घराच्या अंगणात सापडलेला साप.
नागराज नगर येथे एका घराच्या अंगणात सापडलेला साप.
बातम्या आणखी आहेत...