आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना इफेक्ट:लग्नाचा सोनेरी क्षण विसरून कोरोनाच्या युद्धामध्ये लढत आहेत भावी डॉक्टर नववधू-वर

मोहोळएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • ६ मे ला डॉ. अच्युत नरुटे व डॉक्टर सुकन्या हालगुंडे यांच्या लग्नाची तारीख ठरली होती

भारत नाईक

हातावर रंगलेल्या मेहंदी पासून, दारातला मंडप, घरावर बांधलेलं तोरण, आप्त नातेवाईकांची लग्नसोहळ्यासाठी  सुरु असलेली लगबग या सगळ्या गोष्टी नववधु-वरांसाठी कायम स्मरणात राहणाऱ्या व एकमेकांना एका गोड नात्याच्या बंधनामध्ये बांधणाऱ्या.... अशाच गोड बंधनात बांधण्यासाठी मोहोळ तालुक्यातील पोखरापूर येथील डॉक्टर अच्युत भास्कर नरूटे यांनी ६ मे ची लग्नाची तारीख ठरवली होती. परंतु भावी वधू वर डॉक्टर असल्याने त्यांनी अगोदर रुग्णसेवेला प्राधान्य देत नियोजित लग्नाची तारीख पुढे ढकलली.

६ मे ला डॉ. अच्युत नरुटे व डॉक्टर सुकन्या हालगुंडे यांच्या लग्नाची तारीख ठरली. लग्नाची तयारी आणि गडबड दोन्ही घरी सुरू झाली होती. सगळं कसं छान सुरूळीत चाललं होतं.लग्नानंतर येणाऱ्या स्वप्नांच्या जादुई दुनियेमध्ये पाऊल ठेवण्यासाठी डॉ. अच्युत व डॉक्टर सुकन्या हे दोघेही भावी वधू वर अधीर झाले होते.अचानक चीन मधून आलेल्या  कोरोना विषाणूने मध्य पूर्व आशिया,  युरोप, अमेरिकेची वारी करत करत भारतामध्ये प्रवेश केला. पाहता पाहता या आजाराने अक्राळ - विक्राळ रुप धारण केले. संक्रमित लोकांवर उपचार सुरू झाले, अनेक नागरिकांचा दुर्दैवी अंत झाला.संपूर्ण देश ठप्प झाला.

लॉकडाऊनचा कालावधी वाढतच गेला. देशावर ओढवलेल्या या अनपेक्षित युद्धामध्ये आरोग्य विभागातील डॉक्टरांची भूमिका महत्त्वाची असल्याने हे योद्धे आघाडीवर राहिले. डॉक्टर  सुकन्या या मुंबईच्या नायर मेडिकल कॉलेजमध्ये इंटर्नशिप करत आहेत. हे रुग्णालय मुंबई महापालिकेने संपूर्ण कोविड हॉस्पिटल म्हणून घोषित केले आहे. या रुग्णालयात जवळपास ८०० संक्रमित रुग्ण आहेत.तर डॉक्टर अच्युत हे यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पदवीत्तर शिक्षण घेत आहेत. त्यांच्याही रुग्णालयात  कोरोनाची लागण झालेले ८१ रुग्ण उपचार घेत आहेत. डॉक्टर अच्युत व डॉक्टर सुकन्या हे दोघेही  स्वतःच्या लग्नाचा सोनेरी क्षण विसरून कोरोना च्या या युद्धामध्ये लढत आहेत.जीवावर उदार होऊन स्वतःच्या इच्छा,आकांक्षांना आवर घालून समाजासाठी अविरत काम करणाऱ्या या दोन्ही भावी डॉक्टरांचे काम कौतुकास्पद आहे.

परमेश्वराने आम्हा दोघांनाही खूप मोठी रुग्णसेवेची, या युद्धामध्ये आघाडीवर राहून लढण्याची संधी दिली आहे.सुदैवानं सुकन्या सारखी लढाऊ मुलगी मला पत्नी म्हणून मिळाली आहे.  याचा मला अभिमान आहे. देशावर आलेलं हे वाईट संकट लवकरच दूर होईल आणि आम्ही विवाहबंधनात बंधील होऊ.-डॉ. अच्युत नरुटे, कै.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात, यवतमाळ.लग्नाचा सोनेरी क्षण विसरून कोरोना च्या युद्धामध्ये लढत आहेत भावी डॉक्टर नववधू वर

बातम्या आणखी आहेत...