आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधन:पंढरपूरचे माजी आमदार सुधाकर रामचंद्र परिचारक यांचे निधन, सहकारातील डॉक्टर म्हणून त्यांची ओळख होती

पंढरपूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पंत, श्रीमंत आणि मालक म्हणुन मिळविला होता नावलौकीक

पंढरपूरचे माजी आमदार आणि सहकारातील डॉक्टर म्हणून ओळखले जाणारे सुधाकर रामचंद्र परिचारक (वय ८४) यांचे पुणे येथील एका खासगी रुग्णालयात सोमवारी रात्री साडे अकरा वाजता अल्प आजाराने निधन झाले. त्याच्या ज्येष्ठ बंधूवरही पुण्यातच उपचार चालू आहेत.

सुधाकरपंत यांच्यामागे मागे एक भाऊ, पुतणे, सुना तसेच नातवंडे आणि पणतू असा मोठा परिवार आहे. त्यांनी सलग पाच वेळा पंढरपूर विधानसभा मतदार संघाचे त्यांनी प्रतिनिधीत्व केले होते. दरम्यान त्यांच्या निधनामुळे सोलापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.

पंढरपूर अर्बंन बँक, श्रीपूर येथील श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना, टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याची यशस्वीपणे त्यांनी धुरा सांभाळली होती. पांडुरंग आणि भीमा सहकारी साखर कारखान्यास कर्जाच्या खाईतून बाहेर काढून त्यांनी जिल्ह्यात सर्वाधिक दर देणारे साखर कारखाने म्हणून नावलौकिक मिळवुन दिला होता. सहकारी संस्थांच्या सभासदांचे हित जोपासत कोणतीही संस्था आदर्शपणे कशी चालवावी याचे कौशल्य त्यांच्याकडेच होते. त्यामुळेच सहकाराचे डॉक्टर म्हणून देखील आवर्जून त्यांचा उल्लेख केला जात होता. सोलापूर जिल्हा परिषद, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा दूध संघ आदीं संस्थांवर देखील आपला दबदबा ठेवत जिल्ह्यातील राजकारणात स्वत:चे भक्कम असे स्थान पंतांनी निर्माण केले होते.

परिचारकांनी जनता पक्षातर्फे १९७८ मध्ये पहिल्यांदा पंढरपूर विधानसभेची निवडणूक लढविली होती. या निवडणूकीत ओदुंबर पाटील यांनी त्यांचा पराभव केला होता. मात्र पराभवाने ते खचून गेले नाहीत. पुढे १९८५ मध्ये पहिल्यांदा ओदुंबर पाटील यांचे कट्टर समर्थक असलेल्या यशवंतभाऊ पाटील यांचा मोठ्या फरकाने त्यांनी पराभव केला. त्या नंतर पराभव कसला तो परिचारकांनी पाहिला नाही. १९९० मध्ये काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढवत जनता दलाचे पी.बी.पाटील यांचा तर १९९५ मध्ये जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ओदुंबर पाटील यांचे पुत्र राजाभाऊ पाटील यांचा पराभव त्यांनी केला. राज्याच्या राजकारणात वसंतदादा पाटील गटाचे म्हणून सुरुवातीला त्यांची, विजसिंह मोहिते आणि जिल्ह्यातील अन्य नेत्यांची ओळख होती. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेच्या वेळी काळाची पाऊले ओळखत जिल्ह्यातील विजयसिंह मोहित्यांसह इतर मातब्बर नेत्यांना शरद पवारांच्या पाठीशी उभे करण्यात पंतांचा सिंहाचा वाटा होता.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे १९९९ मध्ये त्यांनी निवडणूक लढवून अपक्ष उमेदवार वसंतराव काळे यांचा पराभव केला होता. २००४ मध्ये यशवंतभाऊ पाटील यांचे पुत्र राजुबापू उर्फ पांडुरंग पाटील यांना देखील त्यांनी पराभूत केले होते. मात्र २००९ मधील विधानसभेच्या निवडणुकीवेळी प्रचाराचा नारळ फोडून देखील विजयसिंह मोहितेंसाठी आपला हक्काचा पंढरपूर विधानसभा मतदार संघ त्यांनी सोडला होता. या निवडणूकीत विजयसिंहाना पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे मोहिते आणि परिचारकांमध्ये काहीकाळ कटुता निर्माण झाली होती. पुढे २०१४ मध्ये पुतणे प्रशांत परिचारक यांना निवडणूकीच्या रिंगणात त्यांनी उतरले होते. मात्र प्रशांत यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. पराभवाने खचून न जाता भाजपचे सहयोगी सदस्य म्हणून विधान परिषदेवर पुन्हा प्रशांत यांना निवडून आणण्यात त्यांनी मोठी भूमिका बजावली होती.

नुकत्याच २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत ८३ वय असताना देखील एखाद्या तरुणाला लाजवेल अशा पध्दतीने प्रचारात सक्रीय राहून भाजपच्या वतीने त्यांनी निवडणूक लढविली होती. मात्र दुर्देवाने पराभवाला त्यांना सामोरे जावे लागले. या देखील निवडणूकीत पराभवाने खचून न जाता सार्वजनिक कार्यक्रमातून ते सक्रीय रहात होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे उपचारासाठी पुणे येथे त्यांना दाखल करण्यात आले होते. दरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यामुळे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातील पितामह हरपल्याची भावना सर्वसामान्यांतून आपसुकच व्यक्त होताना ऐकावयास मिळत आहे.

पंत, श्रीमंत आणि मालक म्हणुन मिळविला होता नावलौकिक

सुधाकर परिचारकांनी राज्य राज्य परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेत तोट्यातील महामंडळाचा तोटा काही प्रमाणात कमी करुन त्याच महामंडळाची फायद्याच्या दिशेने वाटचाल करण्याची किमया त्यांनी करुन दाखविली होती. लोकांमध्ये मिसळुन काम करण्याचा त्यांचा हातखंडा होता. त्यामुळे सर्वसामान्यांत त्यांच्या बद्दल विशेष आपुलकी होती. या आपुलकी पोटीच ज्येष्ठ नेते शरद पवार, गणपतराव देशमुख यांच्या पासून ते संपुर्ण राज्यभरात पंत,श्रीमंत किंवा मालक म्हणून आदराने त्यांचा उल्लेख केला जात असे. राजकीय कारकीर्दीतील आपल्या स्वच्छ प्रतिमेमुळे पंतांचा राजकारणातील संत म्हणून देखील आवर्जुन उल्लेख होत असे. आपल्या पक्षासह राज्यातील इतर राजकीय पक्षांमधील वरिष्ठ नेते मंडळी देखील त्यांचा शब्द प्रमाण मानत असत. राजकारणातील प्रदीर्घ अनुभवामुळेच जिल्ह्यातील नेते वडिलकीच्या नात्याने आवर्जुन पंतांचा सल्ला देखील घेत असत.

बातम्या आणखी आहेत...