आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावन्यजीव अधिसूचीमधील मोर, पोपट व धनेश पक्षी वन विभागास न कळवता बाळगल्याप्रकरणी मानद वन्य-जीवरक्षक भरत छेडा व तत्कालीन पोलिस आयुक्त हरिष बैजल यांना वन विभागाने कारण दाखवा नोटीस बजावली आहे. पण त्यावर त्यांनी अद्याप उत्तर दिले नाही. आठ महिन्यांपूर्वी त्यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवर वन विभागातर्फे कागदोपत्री सोपस्कार सुरू आहेत.
तत्कालीन पोलिस आयुक्त बैजल यांनी येथील शासकीय निवासस्थानी एका पिंजऱ्यामध्ये लव्हबर्ड ठेवले होते. विद्यार्थ्यांसह, सामाजिक, राजकीय यासह विविध क्षेत्रांतील लोकांनी त्या शासकीय निवासस्थानी भेट देऊन पक्षी पाहिले होते. त्यासंदर्भात छायाचित्र समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाले होते. वन्यजीव अधिसूचीमध्ये समाविष्ट असलेले राष्ट्रीय पक्षी मोर, पोपट व धनेश पक्षी पोलिस आयुक्तांच्या शासकीय निवासस्थानी असून त्यासंदर्भात वन विभागाची परवानगी घेतली आहे काय? या अनुषंगाने वन्यजीवप्रेमी पंकज चिंदरकर यांंनी मार्च २०२२ मध्ये वन विभागाच्या १९२६ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार दाखल केली होती. तसेच, लेखी तक्रार त्यांनी दिली होती. त्यानंतर वन कर्मचाऱ्यांनी मोर, पोपट पक्षी ताब्यात घेतले होते.
त्यावेळी नोंदवलेल्या जबाबामध्ये उपचार व देखभालीसाठी छेडा यांच्यामार्फत दाखल झाल्याचा जबाब वनविभागाने नोंदवला होता. पण, वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अन्वये अधिसूचीमध्ये समाविष्ट असलेले पक्षी बाळगणे, त्यांच्यावर उपचारासाठी वन विभागाची परवानगी आवश्यक असते. त्यासंदर्भात कोणतीही पूर्वकल्पना वन विभागास दिली नसल्याप्रकरणी छेडा यांना आत्तापर्यंत तीन नोटिसा पाठवल्या असून त्यांनी पूर्ण जबाब दिलेला नाही. नोटिशीला उत्तर दिलेले नसल्याचे वन विभागातर्फे सांगण्यात आले. तसेच, वन कायद्यान्वये ते पक्षी पोलिस आयुक्तांच्या शासकीय निवासस्थानी आढळल्याने त्यांना त्याप्रकरणी नोटीस बजावली आहे.
कारवाईबाबत वन विभागाची टोलवाटोलवी माजी पोलिस आयुक्त हरिष बैजल बुधवारी (दि.७) सोलापुरात आले होते. दुपारपर्यंत वन विभागाकडे त्यांनी नोटीस प्रकरणी बाजू मांडलेली नव्हती. त्यासंदर्भात वनपरिक्षेत्र अधिकारी दीपक खलाणे वन कायद्यान्वये कारवाई करीत असून त्यांच्याकडे अधिक माहिती घ्या, असे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी सांगितले. वनपरिक्षेत्र अधिकारी खलाणे यांना विचारले असता, नोटीस बजावली आहे. पण, ती कोणाला बजवाली? कोणावर गुन्हे दाखल करणार? यासह इतर तपशील आम्ही नंतर प्रेस नोट काढून कळवू, आत्ताच त्यासंदर्भात अधिक माहिती देऊ शकत नाही, असे खलाणे यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.