आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दागिने चोरीला:चार दिवसांवर लग्न, 17 तोळे दागिने चोरीला गेले; पोलिसांनी 24 तासांत शोधून दिले

सोलापूर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चार दिवसांवर लग्न सोहळा होता. मुंबईहून हुमनाबाद येथे लग्नासाठी जाताना १७ तोळे दागिन्यांची चोरी झाली. पोलिसांनी फक्त २४ तासांत या चोरीचा छडा लावला आणि दागिने जप्त केले. दिलीप उर्फ धनुष्य रामण्णा माने (वय २४, रा. मंठाळ महादेव मंदिराजवळ, बसवकल्याण, बीदर कर्नाटक) याला अटक झाली आहे. मरियम मशाक शेख (रा. कुरेशी कंपाऊंड, बहीराम बाग,जोगेश्वरी पश्चिम, मुंबई) यांनी १७ जून रोजी फौजदार चावडी पोलिसात फिर्याद दिली होती.

मरीयम शेख या मुंबईहून हुमनाबाद येथे जात होत्या. १५ जून रोजी सायंकाळी त्यांनी प्रवास सुरू केला. १६ जून रोजी मध्यरात्री दीडच्या सुमाराला भिगवण येथे जेवणासाठी काही काळ बस थांबली. भिगवण ते सोलापूर दरम्यान माने याने पर्स चोरली. तो सोलापुरात उतरला. त्याने मुंबईहून बिदरपर्यंत तिकीट काढले होते.

चोर सोलापूरला उतरला अन् जाळ्यात सापडला

माझे पोट दुखत आहे. दवाखान्याला जायचे आहे, असे सांगत माने सोलापुरात जुना पुणे नाका येथे उतरला. शेख यांना नळदुर्ग येथे गेल्यानंतर चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी सोलापुरात येऊन फौजदार चावडी पोलिसात फिर्याद दिली. जय भवानी ट्रॅव्हल्सचे चालक मोहम्मद कुरेशी याच्याकडे प्राथमिक चौकशी केली. सोलापुरात उतरलेल्या तरुणाचे त्याने वर्णन सांगितले. ट्रॅव्हल्स कंपनी बुकिंग ऑफिसमध्येही चौकशी करण्यात आली व तांत्रिक बाबींचा आधार आणि वर्णन यावरून माने याला पोलिसांनी जेरबंद केले. तो सोलापुरातील वल्याळ क्रीडांगण मैदानाच्या बाजूला फिरत होता. कोणीही ओळखीचे नसल्यामुळे तो दागिने कुठे विकायचा या विचारात होता. पोलिसांनी त्याच कालावधीत त्याला जेरबंद केले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. १७ तोळे दागिने, पैसे आणि मोबाइल जप्त केल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनील दोरगे यांनी दिली.

या पथकाने केली कारवाई : पोलिस आयुक्त राजेंद्र माने, उपायुक्त बापू बांगर, सहायक आयुक्त प्रीती टिपरे, श्री. दोरगे, श्री. क्षीरसागर यांच्यासह महेश शिंदे, राजू मुदगल, कुमार शेळके, तात्यासाहेब पाटील, कृष्णात कोळी, विद्यासागर मोहिते, वसीम शेख, प्रकाश गायकवाड, सिद्धाराम देशमुख, अजय गुंड, विजय वाळके, महेंद्र ठोकळ या पथकाने केली.

पैशाची अडचण असल्यामुळे चोरी ^माने याला पैशाची अडचण होती. तो गावाकडे ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करतो. त्याच्यावर पूर्वी चोरीचा गुन्हा दाखल नाही. तो मुंबईहून बीदर येथे जाण्यासाठी प्रवास करत होता. पर्समधील दागिने त्याने चोरल्याची कबुली दिली आहे. चौकशीतून हा गुन्हा उघडकीस आला. शेख यांचा विवाह २१ जून रोजी होता. अन् त्यांचे दागिने चोरीला गेल्यामुळे नातेवाईक तणावात होते. चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर त्यांना खूप आनंद झाला. पोलिसांचे अभिनंदन केले. न्यायालयामार्फत यांना सोमवारी दागिने मिळण्याची शक्यता आहे.'' संजय क्षीरसागर, सहायक पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा

बातम्या आणखी आहेत...