आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:शिरिष घाटे यांच्या मुखपृष्ठांमधून साहित्य-चित्र संवादाचा समन्वय ; ज्येष्ठ चित्रकार भगवान चव्हाण यांचे प्रतिपादन

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्वछंदी मनाच्या चित्रकारांना चित्र काढताना व्याकरणाचे भय नसते. मात्र, शैक्षणिक चौकटीत असलेल्यांना स्वच्छंदी मनाने चित्रं काढता येत नाहीत. जर चित्रं काढली तर त्यांना व्याकरणाची चौकट मोडावी लागते. शिरिष घाटे यांनी चित्रकार, साहित्यिक व प्रकाशक यांना ओळखले आहे. साहित्याचे वाचन करून एक चांगले चित्रण तयार करीत मुखपृष्ठ तयार करणारे एकमेव आहेत. त्यांच्या तोडीचा कोणीच नाही. अशी व्यक्ती आपल्या देशात तयार झाली आहे. त्यांनी रेखाटलेली चित्रं वेगळी दिशा देतात. त्यांनी स्वत:मध्ये एक विद्यापीठ तयार केले आहे. त्यांनी विविध प्रकारची मुखपृष्ठं तयार केली आहेत. त्यांचे जागतिक रेकॉर्ड झाले आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ चित्रकार भगवान चव्हाण यांनी केले. ग्रंथालीकडून प्रकाशित व शिरिष घाटे लिखित " पुस्तकांच्या चित्रवाटा' या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी पार पडला. यावेळी चव्हाण बोलत होते. व्यासपीठावर कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, प्रिसीजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डाॅ. सुहासिनी शहा, लेखक शिरिष घाटे, रवींद्र मोकाशी आदी उपस्थित होते. यावेळी भाई छन्नुसिंह चंदेले स्मृती केंद्राच्या वतीने लेखक घाटे यांच्यासह मुद्रितशोधक पुरुषोत्तम नगरकर, अक्षर जुळणी करणारे मयूर मणुरे यांचाही याप्रसंगी गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन माधव देशपांडे यांनी केले. चव्हाण म्हणाले, शिरिष घाटे यांच्या चित्रांना तोड नाही. त्यांनी चित्रालाच शब्दांची जोड दिली आहे. कोणत्याही लेखकाच्या पुस्तकाला मुखपृष्ठ द्यायचे असेल ते अगोदर पुस्तक वाचतात. त्यानुसार चित्रण तयार केले जाते. मनाचे समाधान होत नाही तोपर्यंत चित्र रेखाटण्याचे काम करतात.

अर्थ व शब्दांना जोडण्याचे काम चित्र करते- कुलकर्णी अभिनेते गिरीश कुलकर्णी म्हणाले, शब्द किंवा वाक्यातून एखाद्या गोष्टीचा अर्थबोध होत नाही. त्याच्या पलीकडेही जाऊन चित्रं अर्थ व शब्दाचे नातं जोडण्याचे काम करतात. आजच्या शिक्षणातून कला हरवून चालली आहे. भाषा व संवादाच्या बाबतीत अडचणी येतात. आकलन नीट न झाल्याने काहीच समजत नाही. एकमेकांपासून दूर गेलेली, संवाद हरपलेल्या एकत्र आणण्याचे काम पुस्तकांच्या चित्रवाटातून केले आहे. हे पुस्तक सगळ्या विद्यापीठातील ग्रंथालयात वाचण्यासाठी ठेवले पाहिजे. तसेच सोलापुरातील नाट्य चळवळीने चांगले कलाकार,अभिनेते घडवलेत.

आत्मचरित्रे नव्या पिढीचा विचार घडवितात

आत्मचरित्रे ही त्या-त्या व्यक्तिमत्त्वाची जीवन मांडणारी असतात. ते नव्या पिढीचा विचार घडवितात. ‘आठवणीच्या झुडुपातील काजवे’ या आत्मचरित्रातून जुन्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. तरुण पिढीने ते वाचले पाहिजे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले. लेखक तिप्पण्णा परशुराम इंगळे यांच्या ‘आठवणीच्या झुडुपातील काजवे’ या आत्मचरित्राचे प्रकाशन शनिवारी झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी कुलगुरू इरेश स्वामी होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. विलास बेत, प्रकाशक बाबूराव मैंदर्गीकर तर वक्ते म्हणून ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ. अर्जुन व्हटकर उपस्थित होते. इंगळे यांच्या संघर्षमय जीवनाची वाटचाल या पुस्तकात लिहिली आहे. प्राप्त परिस्थितीला दोष न देता समाधानी जीवन जगण्याचा प्रयत्न मांडला आहे. दलित आत्मचरित्रांनी वेगळेपण मांडले आदलित लेखकांनी आम्हीही लिहू शकतो हे दाखवून दिले, असे प्रा. डॉ. व्हटकर म्हणाले. यावेळी श्री. विलास बेत यांनी तिप्पण्णा इंगळे यांनी पहिल्या पुस्तकातून सरळ, सोप्या भाषेतून लिखाण करून आशय सर्वांपर्यंत पोहोचवल्याचे सांगितले. श्री. स्वामी यांचेही भाषण झाले. प्रास्ताविक नरसिंग इंगळे यांनी केले. सूत्रसंचालन कवयित्री सविता इंगळे यांनी केले. यावेळी माजी पोलिस अधिकारी यशवंत व्हटकर, जलसंपदाचे माजी अधीक्षक अभियंता रमाकांत नारायणे, ज्येष्ठ साहित्यिक ना. म. शिंदे, महावितरणचे माजी मुख्य अभियंता लक्ष्मीदास सोनकवडे, पुण्याचे डॉ. पांडुरंग सोनवणे, अभिनेत्री दीप्ती सोनवणे, माजी नगरसेवक रमेश व्हटकर, अशोक कटके, जिल्हा परिषदेचे निवृत्त अधिकारी विवेक शिंदे, समाजकल्याण कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष शांताराम शिंदे, कोल्हापूरचे गणेश नारायणकर उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...