आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरामध्ये शिकणाऱ्या गावाकडील विद्यार्थ्यांना सोयीचे ठिकाण असणाऱ्या नेहरु वसतीगृहाची देखभाल दुरुस्ती, स्वच्छता करून 15 दिवसांमध्ये ते सुरु करा. तेथे राहणाऱ्या अनेकांची जेवणाची गैरसोय होते, त्यासाठी स्वतंत्र किचनशेडची उभारणी करून बचत गटाच्या माध्यमातून सवलतीमध्ये दोनवेळेच चांगल्या जेवणाची सोय करा, त्यासाठी आमदार निधीतून मदत करण्यात येईल, अशा सूचना शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हा परिषद प्रशासनास दिल्या.
नेहरु वसतीगृह कुलूपबंद असल्याबाबत गुरुवारी (ता. 23) 'दिव्य मराठी'मध्ये ‘शहरामध्ये शिकणाऱ्या गावाकडील विद्यार्थ्यांची अडचण, जि. प. उदासीन’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध झाली. त्याची दखल घेऊन काँग्रेसच्या आमदार शिंदे यांनी नेहरु वसतीगृहास भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक उपशिक्षणाधिकारी संजय जावेर, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, शाखा अभियंता रमेश चौगुले, शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे, महिबुब काझी आदी उपस्थित होते.
वसतीगृहाच्या आवारात सर्वत्र गवत, झुडपं उगवली असून खोल्यांमध्ये विद्यार्थ्यांना बेड नसल्याने जमिनीवर झोपावे लागत असल्याचे, समजल्यावर त्यांनी संताप व्यक्त केला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या सोयी-सुविधा देण्यासाठी काय अडचण आहे? गरीब कुटुंबातील विद्यार्थी शिक्षणासाठी शहरात, त्यांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊ नका? शासन-प्रशासनाने त्यांना चांगल्या सुविधा देणे, अभ्यासासाठी प्रोत्साहित करण्याच्या कर्तव्याचा विसर पडू देऊ नका, अशा शब्दात त्यांनी कानउघाडणी केली.
सर्व खोल्यांमध्ये चांगल्या दर्जाचे बेड, गादी, साहित्य ठेवण्यासाठी कपाट द्यावेत. वसतिगृहातील वायरिंग दुरुस्ती करा, लॅपटॉप चार्जिंगसाठी सोय करून द्या, अशा सूचना शिंदे यांनी दिल्या.
येथे राहणाऱ्या अनेक विद्यार्थ्याना गावाकडून जेवणाचे डबे येतात. काहींना वेळेत डबे मिळत नाही, सायंकाळपर्यंत ते खराब होतात. जर, त्यांच्या पोटात अन्न नसेल तर अभ्यासात त्यांचे लक्ष कसे लागेल? गरीब कुटुंबातील त्या मुलांसाठी स्वंतत्र किचन शेड सुरु करा, बचत गटाला चालवायला द्या, किचनशेडसाठी मी आमदार निधी देते, असेही आमदार शिंदेंनी सांगितले. तसेच, हिवाळ्यात गरम स्नानासाठी गरम पाण्याची सोय करा, सौरसंच बसवण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून निधीसाठी प्रस्ताव सादर करण्याची सुचना त्यांनी दिल्या. शेळगी येथील मुलींना वसतीगृहामध्ये सर्व सोयी-सुविधांसह, सुरक्षा यंत्रणा सक्षम करा, असेही त्यांनी सांगितले.
''आमदार प्रणिती शिंदे यांनी नेहरु वसतिगृहास भेट देऊन काही सुचना केल्या. किचन शेड सुरु करण्यासाठी आमदार निधी देण्याची तयारी दर्शविली, त्याचा निश्चित विद्यार्थ्यांना फायदा होईल. दुरुस्तीची काम लवकर करून नेहरु वसतीगृह, शेळगीतील विद्यार्थींंचे वसतीगृह सुरु होईल. वरिष्ठांशी चर्चा करून प्रवेश प्रक्रीया सुरु करण्यात येईल.'' - संजय जावेर, उपशिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.