आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकलूज:ॲट्रॉसिटी मागे घ्या म्हणत रस्ता अडवल्याने मृतदेहावर ग्रामपंचायतीसमोर अंत्यसंस्कार

अकलूज25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ॲट्रॉसिटीचा गुन्हा मागे घ्या, असे म्हणत अंत्ययात्रा शेतातून जाऊ न देता अडवणूक केल्याचा आरोप करत मृतदेह अकलूज पोलिस ठाण्याकडे नेण्याचा प्रयत्न माळेवाडी, बोरगाव (ता. माळशिरस) येथे एका समाजाकडून झाला. पोलिसांनी समजूत काढून अडवणूक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर तेढ संपुष्टात आली. तरीही त्यानंतर शुक्रवारी (दि. २०) सायंकाळी सातच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालयासमोर पोलिसांसमक्ष मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या एकूण प्रकरणात मृताच्या नातेवाइकाच्या फिर्यादीवरून १३ जणांवर ॲट्रॉसिटी व ग्रामसेवकाच्या फिर्यादीवरून सार्वजनिक ठिकाणी अंत्यसंस्कार केल्याप्रकरणी २६ जणांवर २० आॅगस्टला रात्री उशिरा अकलूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी रात्री उशीरापर्यंत कोणालाही अटक झालेली नव्हती. दोन्ही बाजूंच्या फिर्यादीवरून गुन्हे दाखल झाले असून, तपास सुरू असल्याचे पोलिस उपअधीक्षक नीरज राजगुरू यांनी सांगितले. माळेवाडीत धनाजी अनंता साठे यांचे वृद्धापकाळाने गुरुवारी (दि, १९) मध्यरात्री निधन झाले.

शुक्रवारी सकाळी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार होते. परंतु पूर्वीचा अॅट्राॅसिटीचा गुन्हा मागे घ्या, मगच आमच्या शेतातून अंत्ययात्रेसाठी रस्ता देतो, असे म्हणत १३ जणांनी विरोध केला, अशी फिर्याद विमल सुरेश साठे यांनी अकलूज पोलिस ठाण्यात दिली. हा प्रकार पोलिस व महसूल प्रशासनाला समजताच तहसीलदार जगदीश निंबाळकर, पोलिस उपअधीक्षक नीरज राजगुरू, पोलिस निरीक्षक अरुण सुगावकर हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. अंत्यसंस्कार करू देत नसतील तर आम्ही मृतदेह अकलूज पोलिस ठाण्यासमोर नेऊन ठेवू, अशी भूमिका नातेवाइकांनी घेतली. पोलिसांनी वाहने आडवी लावून त्यांना थांबवले. तहसीलदार व पोलिस उपअधीक्षक यांनी स्मशानभूमीत जाण्यासाठी त्यांना पर्यायी रस्ता दाखवून दिला. तो त्यांना मान्य नव्हता. तेव्हा नातेवाइकांना संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन दिले.

पर्यायी रस्ता दाखवला होता
माळेवाडीच्या स्मशानभूमीत जाण्यासाठी साठे कुटुंबीयांना मी व पोलिस उपअधीक्षक नीरज राजगुरू यांनी पर्यायी रस्ता दाखवला होता. त्यांच्या मागणीनुसार संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे देखील ठरले होते. ते त्यांनी मान्य केले होते. तरीदेखील त्यांनी ग्रामपंचायतीसमोर सार्वजनिक ठिकाणी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. - जगदीश निंबाळकर, तहसीलदार, माळशिरस

बातम्या आणखी आहेत...