आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात प्रकरण:अपघातातील मृतांवर मूळ गावी अंत्यसंस्कार

उत्तर सोलापूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे महामार्गावर कोंडी येथे रविवारी रात्री अपघातात ठार झालेल्या चार मृतांवर सोमवारी त्यांच्या गावी कदमवाडी (ता. तुळजापूर) येथे अंत्यसंस्कार झाले.एकादशीनिमित्त पंढरपूरला दर्शनासाठी जाताना ट्रॅक्टरला ट्रकने धडक दिल्याने हा अपघात घडला होता. यात चारजण जागीच ठार तर सातजण गंभीर जखमी झाले होते. ट्रॅक्टर ट्रॉलीतून २७ जण प्रवास करत होते. याप्रकरणी ट्रकचालकाला पोलिसांनी अटक केली आहे. गलीबसाब हुसेनसाब शेख (राहणार डिकसंग, ता. अफजलपूर, जि. कलबुर्गी) असे त्याचे नाव आहे. १६ प्रवाशांना मोठ्या प्रमाणात इजा झाली आहे. सर्व जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चौघांची प्रकृती गंभीर आहे. त्यापैकी तिघांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे.

यांचा झाला मृत्यू : ज्ञानेश्वर दत्तात्रय सांळुखे (वय१४) सुधाकर शिंदे (वय १४), भागाबाई जरासंध मिसाळ (वय ६०) जरासंध माधव मिसाळ (वय ६५).

जयप्रकाश निंबाळकर यांच्याकडून विचारपूस : सोमवारी उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे बंधू जयप्रकाश निंबाळकर यांनी रुग्णालयात अपघातातील जखमींची भेट घेऊन विचारपूस केली. तत्पूर्वी सकाळी शासकीय रुग्णालयात नातेवाइकांनी मोठी गर्दी केली होती. शवविच्छेदनानंतर चारही मृतदेह कदमवाडी येथे अंत्यसंस्कारासाठी नेले. दुपारनंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले.

एसटी बंद असल्याने ट्रॅक्टरमधून निघाले : दरवर्षी कदमवाडी येथील भाविक या वारीसाठी पंढरपूर येथे दशमीच्या दिवशी जात असतात. एकादशीचा मुक्काम करून दुसऱ्या दिवशी माघारी येत असतात. या वर्षी एसटी बससेवा बंद असल्याने भाविकांनी वारीसाठी ट्रॅक्टरची सोय केली होती .

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : वारकरी मंडळ
उत्तर सोलापूर | कोंडी येथील अपघातप्रकरणी ट्रकचालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. तसेच मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये, जखमींचा सर्व उपचार प्रशासनाने करून प्रत्येकी एक लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत द्यावी, अशी मागणी अखिल भाविक वारकरी मंडळाने उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदगल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर इंगळे महाराज, जिल्हाध्यक्ष ज्योतिराम चांगभले, शहराध्यक्ष संजय पवार, शाम येदूर आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...