आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन शिक्षक म्हणून काम करताना सुरुवातीच्या काळात नाममात्र विद्यावेतनावर काम केले. तंत्रज्ञान हा शिक्षणाचा भाग असू शकतो हे मला चांगले अवगत होते. तंत्रज्ञानाशिवाय असलेल्या शिक्षणाची स्थिती काय असेल यासाठी वेगवेगळे प्रयोग करत राहिलो. माझ्या वेतनात ते शक्य नव्हते. वडील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक असल्याने त्यांच्याकडून लॅपटॉप उपलब्ध करून घेतला. त्याच्या वापरातून विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबत तंत्रज्ञानाचे शिक्षण देण्याचे काम सुरू केले. विद्यार्थ्यांना हळूहळू विविध गेम्सच्या माध्यमातून तंत्रज्ञानाची गोडी निर्माण केली. नंतर शालेय शिक्षणातील काही बाबींचे व्हिडिओ दाखवण्याची सुरुवात झाली. त्यांच्या आकाराची मर्यादा आणि मोबाइल, डिस्क, पेनड्राइव्ह इत्यादींद्वारे त्याची देवाणघेवाण करताना अनेक अडचणी येत होत्या. नंतर इलेक्ट्रॉनिक्सच्या व्यावसायिकांकडून क्यूआर कोडबाबत माहिती मिळाली, याचा वापर शालेय शिक्षणासाठी चांगला होऊ शकेल हे लक्षात आल्याने त्याचा वापर सुरू केला व हळूहळू तो लोकप्रिय झाला.
क्यूआर कोडचा वापर राज्यातील पाठ्यपुस्तकातील व्हर्च्युअल ट्रेनिंगसाठी केला. उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य, त्यांचे किल्ले इत्यादींच्या इतिहासातील लिखित भाषेला तंत्रज्ञानाद्वारे जिवंत करण्याचा प्रयत्न केला. यातून विद्यार्थ्यांमध्ये स्वत: पडताळणी करण्याची क्षमता विकसित झाली. या विविध उपक्रमांची दखल घेतली गेली. सुमारे ५० विषयांतील विविध पैलूंचे तज्ज्ञांकडून परीक्षण केल्यानंतर ही निवड झाली आहे. युनेस्को आणि वर्की फाउंडेशनच्या माध्यमातून जगभरातून शिक्षकांसाठी हा पुरस्कार होता. १२ हजारपेक्षा अधिक जणांचा सहभाग होता. पाच वर्षांपासून शिक्षक म्हणून काम करणारा कोणताही शिक्षक यात सहभागी होऊ शकतो. लोकल ते ग्लोबल हा प्रवासदेखील खडतर परिश्रमांचा आहे. अनेक वर्षे वेगवेगळे प्रयोग राबवले, हे सर्व मुलांसाठी केले, ते शिक्षकांसाठी ही प्रेरणादायी झाले आहे. वर्गखोलीतून उपक्रमशीलतेला, नावीन्यशीलतेला दिलेला हा सन्मान आहे, असे म्हणावे लागेल.
असे शिक्षक शांतता प्रस्थापित करण्यासोबतच हवामान बदलावरही कार्य करत राहतील पुरस्कार जाहीर करण्यासाठी आयोजित व्हर्च्युअल समारंभात युनेस्कोच्या शिक्षणविषयक विभागाचे उपमहासंचालक स्टेफानिया जिआन्निनी म्हणाले, रणजितसिंह यांच्यासारखे शिक्षक कार्बन उत्सर्जन थांबवण्याच्या कामी कार्य करतील. शिवाय शांतता प्रस्थापित करण्याकामीही त्यांचे योगदान राहील.
ग्लोबल टीचर पुरस्कार नेमका का व कशासाठी?
शिक्षणाच्या माध्यमातून केवळ विद्यार्थीच नव्हे तर समाजातही आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या सर्वोत्तम शिक्षकांच्या कार्याची जगभर ओळख व्हावी, त्यांचा सन्मान व्हावा याकरिता हा पुरस्कार देण्यात येतो. शिक्षणाचा अभाव हे आजही जगभरात राजकीय,सामाजिक,आर्थिक आणि आरोग्य समस्यांचे मूळ कारण आहे. दारिद्र्य, भेदभाव आणि संघर्षाचे समूळ उच्चाटन करण्याची शक्ती केवळ शिक्षणातच आहे, असे वर्की फाउंडेशनचे मत आहे.
काय हवी पात्रता : सन २०१५ मध्ये या पुरस्कारास सुरुवात झाली. संबंधित देशांच्या स्थानिक कायद्यांनुसार मान्यता असलेल्या शाळांमध्ये शिकवणारा जगातील कोणत्याही देशाचा शिक्षक या पुरस्कारासाठी पात्र ठरतो.
क्यूआर कोडच्या संकल्पनेला देशभर मान्यता
- डिसले यांनी क्रमिक पुस्तकांना क्यूआर कोड देऊन ती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत कशी पोहोचती होतील यासाठी अहोरात्र कष्ट घेतले. त्यानंतर त्यांनी हीच पद्धत महाराष्ट्र सरकारनेही सर्व ग्रेडसाठी लागू करावी म्हणून २०१७ मध्ये राज्य सरकारकडे प्रस्ताव दाखल केला.
- २०१८ मध्ये मनुष्यबळ विकास मंत्रालयाने याची दखल घेऊन क्यूआर कोडची पद्धत एनसीईआरटीच्या क्रमिक पुस्तकांसाठी लागू करण्याची घोषणा केली. डिसले यांच्या प्रयत्नांना मिळालेले हे सर्वात मोठे यश ठरले.
जगभरातून हे १० जण होते अंतिम स्पर्धेत
ज्या अंतिम १० मधून डिसले यांची निवड झाली त्या दहा जणांत ओलासुनकामी ओपिफा (नायजेरिया), जेमी फ्रॉस्ट (ब्रिटन), कार्लाे मेझोन (इटली), मोखुंदू सिंथेया मकाबा (द. आफ्रिका), ली ज्युल्क (अमेरिका), युन जेआँग ह्यून (द. कोरिया), सॅम्युएल इसाई (मलेशिया), डोआनी इमॅनुएला (ब्राझील) आणि व्हिएतनामच्या आणखी एका स्पर्धकाचा समावेश होता.
घरातील अनोख्या प्रयोगशाळेत प्रयोग
डिसले यांनी मुलांसाठी आपल्या घरी प्रयोगशाळा थाटली होती. अनेक वैज्ञानिक प्रयोग ते घरातील प्रयोगशाळेत करून दाखवत.
1. ग्लोबल टीचर पुरस्काराची ही रक्कम १० वर्षांत समान हप्त्यांमध्ये वर्की फाउंडेशनच्या वतीने दिली जाते. यासोबत विजेत्यांना आर्थिक नियोजनाबाबत समुपदेशनही केले जाते.
2. रणजितसिंह डिसले यांच्या प्रयत्नांतून केवळ शिक्षणविषयक जागरूकता निर्माण झाली असे नव्हे, तर शाळांमधून मुलींची संख्याही वाढली. त्यांची उपस्थितीही शंभर टक्के राहू लागली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.