आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:ग्रंथदिंडीत महिलांच्या झांज पथकाने वेधले लक्ष, जैन साहित्य संमेलनाला सोलापूर येथे ग्रंथदिंडीने सुरुवात

सोलापूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगीताचे सूर, वाद्याच्या तालावर झांज पथकाने धरलेला ठेका, फेटे बांधलेले तरुण-तरुणी, नऊवारीतील महिला, टाळ-मृदंगाच्या साथीत अवघा आसमंत दुमदुमून टाकणारा ‘महावीर भगवान की जय’च्या जयघोषात निघालेल्या ग्रंथदिंडीने २५ व्या अखिल भारतीय मराठी जैन साहित्य संमेलनाला शुक्रवारी सोलापूरनगरीत सुरुवात झाली.

जैन महिला विकास मंडळाच्या वतीने झांज खेळ सादर करण्यात आले. याची तयारी गेल्या पंधरा दिवसांपासून केली जात होती. सम्राट चौक, हुतात्मा चाैक आणि हुतात्मा स्मृती मंदिर या ठिकाणी झांज पथकाने उत्कृष्ट नृत्य सादर केले. या पथकात १६ तरुणी, दाेन ढाेल वाजवणारे आणि एक झांज वाजवणारा अशा एकूण १९ जणांचा समावेश हाेता. सर्व सदस्यांनी फेटे आणि पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केले होते.

श्राविका शाळेतून ग्रंथदिंडीची सुुरुवात करण्यात आली. प्रारंभी जैन वक्त्या विपुलदर्शना आणि रुचीदर्शना यांच्या हस्ते ग्रंथाची पूजा करण्यात आली. या वेळी संमेलनाध्यक्ष डाॅ. रावसाहेब पाटील, स्वागताध्यक्ष मिलिंद फडे, ज्येष्ठ लेखिका सुरेखा शहा, हर्षवर्धन निंबर्गीकर, मिहिर गांधी, सुजाता शहा, माजी नगरसेवक किरण देशमुख, आनंद चंदनशिवे, डी. ए. पाटील, डाॅ. कल्याणी गंगवाल, केतन शहा, मनीष शहा, श्याम पाटील, वालचंद पाटील, माया पाटील, पंकजा पंडित, सुवर्णा कटारे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

दिंडीसाठी मुडबिद्री (कर्नाटक) येथून जैन धर्माचे लिपीबद्ध झालेले धर्मग्रंथ पूजेसाठी आणले होते. सोनेरी रंगात सजवलेल्या पालखीत ते ठेवले हाेते. दिंडीत पाच बग्ग्या होत्या. यामध्ये साहित्यिक, ज्येष्ठ मंडळी विराजमान झाली होती. सम्राट चौक येथील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. रावजी सखाराम प्रशालेतील विद्यार्थ्यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूने उभे राहून ग्रंथदंडीवर पुष्पवृष्टी केली.

महापालिकेची उदासीनता
२५ वे अखिल भारतीय मराठी जैन साहित्य संमेलन २९ राेजी साेलापुरात हाेणार असल्याची कल्पना महापालिका प्रशासनास हाेती तरीही सम्राट चाैक येथे साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यात आला नाही. तसेच हा चाैक स्वच्छही ठेवता आला नाही. त्यामुळे या साचलेल्या पाण्यातून वाट शाेधत जावे लागत हाेते.

बातम्या आणखी आहेत...