आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील शेतकऱ्यांचा ऊस उत्पादनाकडे सर्वाधिक कल आहे. त्यासोबतच अन्य बागायती पिके घेतली जातात. मात्र, गेल्या काही वर्षांत द्राक्ष उत्पादनातून मिळणारा लाभ पाहता शेतकरी त्याच्या लागवडीला पसंती देताना दिसत आहेत. विशेष म्हणजे शेतीक्षेत्रात उतरलेला तरुणवर्ग आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत द्राक्ष उत्पादन घेत आहे. सध्या जिल्ह्यात १५ हजार सात हेक्टरवर द्राक्ष क्षेत्र आहे. तर माढा तालुक्यात १४३२ हेक्टर क्षेत्रावर द्राक्ष आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा तालुक्यात ३५० हेक्टर क्षेत्र वाढले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात द्राक्ष उत्पादन आणि रोजगार यातून समृद्धी येत आहे.
ऊस लागवडीपासून तोडणीपर्यंत वर्षभराहून अधिक जाणारा काळ, साखर कारखान्यांकडून वेळेत आणि योग्य प्रमाणात न मिळणारा दाम यामुळे शेतकरी द्राक्ष उत्पादनाकडे वळत आहेत. खाण्यासाठी बाजारात विक्री व बेदाणा उत्पादनातून मिळणारे चांगले उत्पन्न हेही यामागचे एक कारण आहे. त्यातच जिल्ह्यातील वातावरण द्राक्ष व त्यापासून बेदाणा उत्पादनासाठी पोषक आहे. त्यामुळे शेतकरी पारंपरिक पीकपद्धतीला बगल देत द्राक्ष लागवडीकडे वळत आहे. योग्य नियोजन, व्यवस्थापन व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर याद्वारे अधिक उत्पन्न मिळवत आहेत. सध्या बाजारात द्राक्ष प्रतिकिलो ५० ते ६५ रुपये दराने विकली जात आहेत. तर बेदाणा प्रतिकिलो १६० ते २१० रुपये दराने विकला जात आहे. त्यामुळे तालुक्याच्या सीना नदी खोऱ्यासह पूर्व भागात द्राक्षबागा वाढत असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे यांनी सांगितले.
द्राक्ष विक्री, बेदाणा निर्मितीतून चांगली कमाई
यामुळे द्राक्षबाग लाभदायक : नव्या वाणांची निर्मिती, पोषक वातावरण, नैसर्गिक कारण वगळता नुकसानीचे कमी प्रमाण, हमखास उत्पन्न, अत्याधुनिक अवजारे व यंत्रे, द्राक्ष व बेदाणा विक्रीनंतर मिळणारी एकरकमी रक्कम.
खरीप, रब्बी हंगामावर परिणाम
तालुक्यातील खरीप व रब्बीच्या हंगामावर परिणाम झाला आहे. उसाला फाटा देत शेतकरी द्राक्ष लागवडीकडे वळत आहेत. द्राक्ष उत्पादनातून मिळणाऱ्या एकरकमी पैशामुळे शेतकरी याला पसंती देत आहेत. मानेगाव, कापसेवाडीत सर्वाधिक लागवड आहे. जिल्हात १४३२ हजार हेक्टर द्राक्ष क्षेत्र आहे. माढ्यात ३५० हेक्टर क्षेत्र वाढले आहे.'' भारत कदम, तालुका कृषी अधिकारी, माढा
लागवडीचा खर्च
द्राक्षबाग लागवडीसाठी एकरी पाच लाखांचा खर्च येतो. रोपे, ठिबक सिंचन, औषधे, खते यासाठी दोन लाख, लोखंडी फाउंडेशनसाठी तीन लाखांचा खर्च येतो.
तालुक्यातील द्राक्ष उत्पादक गावे
मानेगाव, कापसेवाडी, बावी, निमगाव मा. धानोरे, पिंपळखुटे, अरण, मोडनिंब, उपळाई बुद्रुक, धानोरे, बावी.
जिल्ह्यात १५ कोटींहून अधिक रुपयांची होते उलाढाल
द्राक्षबागेसाठी जिल्ह्यातील वातावरण पोषक आहे. द्राक्ष उत्पादनात जोखीम असल्याचे सत्य नाही. उसापेक्षा द्राक्ष उत्पादन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. जिल्ह्यात द्राक्ष उत्पादनातून सुमारे १५० कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल होते. त्यातून शेतकऱ्यांची प्रगती होत आहे.'' नितीन कापसे, द्राक्ष बागायतदार, कापसेवाडी, ता. माढा
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.