आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेर आये दुरुस्त आये या उक्तीप्रमाणे उशीरा का होईना महापालिकेने एक चांगला निर्णय घेतला आहे. शहरातील मैदाने, मोकळ्या जागा आता आजोरामुक्त होणार आहेत. यामुळे शहराच्या सौंदर्याला बाधक राडारोडा दूर होणार आहे. आजोरा हटवण्यासाठी आणि शहराबाहेर नेण्यासाठी महापालिकेने रीतसर मक्तेदार नेमण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पुढील दोन महिन्यात ही यंत्रणा कार्यान्वित होईल.
शहरातील पद्मशाली स्मशानभूमी, हवामान खाते कार्यालय, धर्मवीर संभाजी तलाव, विडी घरकुल, विवेकानंद केंद्राच्या मागील मोकळे मैदान या ठिकाणी अस्ताव्यस्त पद्धतीने आजोरा टाकला जात होता. असा कोठेही मोकळ्या जागेत टाकलेल्या आजोऱ्यासह भविष्यात निर्माण होणारा आजोराही महापालिकेच्या वतीने उचलून भोगाव कचरा डेपो येथे नेण्यात येणार आहे. तेथेच आजोऱ्याचे पाच प्रकारात वर्गीकरण करून विक्री करण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेने मक्ता काढला आहे. अय्यर एन्व्हायर्नमेंट रिसोर्स मॅनेजमेंट प्रा. लि. या कंपनीने मक्ता भरला आहे. ३७० रुपये प्रतिटन असा दर निश्चित केला आहे. याबाबत कंपनीशी चर्चा करून वर्कआॅर्डर देण्यात येणार आहे, अशी माहिती पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली आहे.
आजोऱ्याचे असे होईल वर्गीकरण : आजोऱ्याचे वाळू, दगड, खडी, माती आणि कचरा असे पाच प्रकारात वर्गीकरण करण्यात येणार आहे. वर्गीकरण केलेला माल मक्तेदार विकू शकणार आहे.
पाच एकर जागेत प्रकल्प : भोगाव कचरा डेपो येथे आजोरा वर्गीकरण करण्यासाठी ५ एकर जागा देण्यात येणार आहे. त्यातील एका एकरात मशीन आणि चार एकरात आजोरा संकलन असेल.
२४ ते ४८ तासांत उचलणार आजोरा
शहरातील आजोरा उचलण्यासाठी संबंधितांनी महापालिकेकडे अर्ज करायचा आहे. त्याची माहिती मक्तेदारास जाईल. संबंधित आजोरा स्वत:हून उचलून वाहतूक करतील. यामुळे नागरिकांची सोय होणार आहे. नागरिकांनी प्रतिटन ३७० रुपये याप्रमाणे पालिकेकडे रक्कम भरायची आहे. आजोरा उचलण्यासाठी खासगी व्यक्तीस शोधावे लागणार नाही. पालिकेकडे अर्ज केल्यास २४ ते ४८ तासांत आजोरा उचलण्यात येणार आहे.
सध्या येथे साचलाय आजोरा
पद्मशाली स्मशानभूमी, धर्मवीर संभाजी तलाव, हवामान खाते कार्यालय, शास्त्रीनगर, तुळजापूर रोड, रेणुकानगर, प्रतापनगर, स्मृती उद्यान, विडी घरकुल, हैदराबाद रोडसह अनेक मोकळ्या मैदानांवर आजोरा टाकण्यात येत आहे. ते यापुढे बंद होईल.
इतरत्र टाकल्यास होईल दंड
नागरिकांनी आजोरा असल्यास पालिकेस कळवावे. अन्य ठिकाणी आजोरा टाकल्यास महापालिका संबंधित व्यक्ती आणि जागा मालकास दुपटीपेक्षा जास्त दंडाची आकारणी करेल, अशी माहिती पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.
शहरात रोज १०० टन आजोरा
शहरात रोज सुमारे १०० टन आजोरा निर्माण होतो, असा अंदाज नगर अभियंता संदीप कारंजे यांनी व्यक्त केला. यातून महापालिकेला रोज ५० हजार ते लाख रुपये मिळत असावेत, असा अंदाज आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.