आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सणउत्सव:नववर्षे शुभकृत, मान्सूनचे आगमन लवकर; समाधानकारक पर्जन्यमान, पंचांगकर्ते ओंकार दाते यांनी दिली माहिती

सोलापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आनंद साजरा करण्याचा गुढीपाडवा सण येत्या शनिवारी (दि.२) येत आहे. प्रत्येक संवत्सराला (वर्षाला) नाव दिलेले असते. नवीन शके १९४४ या संवत्सराचे नाव शुभकृत संवत्सर आहे. नवीन वर्षांत तीन अंगारक चतुर्थीचे योग आहेत. केरळच्या किनारपट्टीवर नेहमीपेक्षा लवकर मान्सूनचे आगमन होणार आहे. पाऊस समाधानकारक होईल, असे भाकीत पंचांगकर्ते ओंकार मोहन दाते यांनी केले.

श्री. दाते म्हणाले, “ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केल्यावर सृष्टीला चालना दिली तो पहिला दिवस म्हणजे गुढीपाडव्याचा दिवस. गुढी उभी करणे हे विजयाचे, आनंदाचे आणि मांगल्याचे प्रतीक मानले जाते. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक, त्यामुळे नवीन उद्योगाचा, व्यवसायाचा शुभारंभ करण्यास हा उत्तम मुहूर्त समजला जातो. यामध्ये नूतन संवत्सराची सुरुवात करणारा म्हणून चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस हा एक महत्त्वाचा शुभ दिवस मानला जातो. नववर्षाच्या संवत्सराचे नाव ‘शुभकृत’ आहे. त्यामुळे या वर्षांमध्ये शुभ घडेल. वाईट घटना, आपत्तीची शक्यता नसल्याचे त्यांनी सांगितले.

नववर्षातील ठळक
अंगारक चतुर्थीचे तीन योग आहेत.
जून, जुलै, ऑगस्टमध्ये गुरुपुष्यामृत योग आहे.
१३ एप्रिल रोजी गुरू मीन या स्वगृही प्रवेश करत असून २९ एप्रिलला शनि कुंभ राशीत प्रवेश करेल. १२ जुलैला शनि पुन्हा वक्री मकर राशीत प्रवेश करत आहे.
नववर्षांमध्ये ६० पेक्षाही अधिक विवाह मुहूर्त आहेत. तुळशी लग्नानंतर त्यापैकी ३० आहेत.
दिवाळी लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी २५ ऑक्टोबरला खंडग्रास सूर्यग्रहण असून देशभरात सर्वत्र दिसणार आहे.
कार्तिक पौर्णिमेस ८ नोव्हेंबरला ग्रस्तोदित प्रकारचे चंद्रग्रहण भारतात सर्वत्र पाहता येईल.
यंदाच्या वर्षी केरळच्या किनारपट्टीवर मान्सून नेहमीपेक्षा लवकरच येईल.
पाऊस समाधानकारक होईल.
पावसाळ्याच्या उत्तरार्धात मात्र पर्जन्यमान कमी राहील. पण, एकंदरीत सरासरी इतका पाऊस होईल.

असे करावे गुढीपाडव्याचे पूजन
सकाळी घरोघरी गुढ्या उभ्या करून, तोरणे लावून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. संवत्सरारंभाच्या दिवशी गुढीबरोबर पंचांगावरील गणपतीचे पूजन करा.
हा उत्सव घरोघरी करावयाचा असल्यामुळे आपण स्वतंत्रपणे राहात असल्यास आपल्या घरी ही पूजा करून गुढी उभी करण्यास काहीच हरकत नाही. त्याकरिता असे कोणतेच बंधनही नाही. त्यामुळे गुढीपूजन, पंचांग पूजन अवश्य करावे.
गुढीपूजनाकरिता कोणताही विधी नाही. गुढी उभी करणे हे मांगल्याचे प्रतीक आहे. त्यामुळे मंगलमय वातावरण तयार व्हावे याकरिता जे काही करता येण्यासारखे असेल तर सर्व करता येते.
गुढी उभी करण्यासाठी आपण जी काठी वापरणार आहोत ती स्वच्छ धुवून, पुसून घ्यावी. त्याला रेशमी अथवा नवीन वस्त्र, बांधून त्यावर एखादे चांदी अथवा धातूचे भांडे ठेवावे.
गुढीला कडूनिंबाची पाने, आंब्याच्या डहाळ्या बांधाव्यात, साखरेची माळ घालावी.
ब्रह्म ध्वजाची पुढील मंत्राने प्रार्थना करावी.
ब्रह्मध्वज नमस्तेSस्तु सर्वाभिष्ट फलप्रद ।
प्राप्तेSस्मिन्वत्सरे नित्यं मदगृहे मंगल कुरु ।।
पंचांगाचे पूजन करून नवीन वर्षाचे पहिल्या दिवसाचे पंचांग वाचावे. त्यानंतर वर्षभरातील महत्त्वाच्या घटना पीक-पाणी यांची माहिती करून घ्यावी. सकाळी लवकर गुढी उभी करावी आणि सूर्यास्ताचे सुमारास नमस्कार करून ती पुन्हा उतरवून ठेवावी.

बातम्या आणखी आहेत...