आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:वंचित महिलांना आराेग्य सेवा,900 जणांची नाेंदणी; आराेग्य गटाच्या माध्यमातून सर्वसामान्य महिलांना मिळेल उपचार

अश्विनी तडवळकर | सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्वस्ती फाउंडेशन बंगळुरू आणि देहविक्री करणाऱ्या महिलांची क्रांती संघटना या दोन्हीच्या संयुक्त विद्यमाने वंचित आणि आर्थिकदृष्ट्या मागास असणाऱ्या महिलांसाठी आरोग्य गट ही नवीन संकल्पना राबविण्यात येणार आहे. या आरोग्य गटाच्या माध्यमातून दहा महत्त्वपूर्ण अशा आजारांवर उपचार करण्याकरिता आणि तपासणी करण्याकरिता हा गट योजिला आहे.या आरोग्य गटाच्या माध्यमातून प्रत्येक महिलेने महिन्याकाठी दोनशे रुपये आपल्या आरोग्याच्या तपासणीसाठी आणि उपचारासाठी तरतूद करून ठेवायचे आहेत. त्याकरिता फाउंडेशन त्यांना मदत करणार आहे. त्यानंतर जेव्हा त्यांना हवे त्यावेळी ही रक्कम व्याजासहित पुन्हा काढून घेऊ शकणार आहेत. याकरिताची संपूर्ण प्रणाली बँकेप्रमाणे केली जाणार असून महिलांना आरोग्याची तरतूद करण्यासाठी हातोहात केली जाणारी ही एक वेगळी मदत असणार आहे. याकरिता जवळपास ९०० महिलांनी विविध क्षेत्रातून आपली नावनोंदणी केली आहे.

सोलापूर शहरात ही संस्था कार्यान्वित झाली असून ९०० महिलांची ॲनिमियाची तपासणी नुकतीच वेगवेगळ्या विभागात करण्यात आली आहे. यानुसार इंदिरानगर, नई जिंदगी, तरटी नाका परिसर, क्रांती कार्यालय अशा अनेक ठिकाणी ही सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेत देहविक्री करणाऱ्या महिलांव्यतिरिक्त देवदासी विधवा महिला गोरगरीब महिला दारिद्र्यरेषेखालील महिला आणि कामगार व संघटित महिलांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेत कष्टकरी महिला कोणत्याही ठिकाणाहून शहरांतर्गत आपली नोंदणी करू शकतात.

पाच राज्यांत स्वस्तीचे काम, दहा आजारांचा समावेश
स्वस्ती संस्थेच्या माध्यमातून तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक आणि आता महाराष्ट्र या पाच राज्यांमध्ये आरोग्य गटाचे काम सुरू आहे. तीन लाखांहून अधिक महिलांपर्यंत या संस्थेने आरोग्य सेवा पोहोचवली आहे. यात रक्तदाब, मधुमेह, थायरॉईड, ॲनिमिया, दातांची तपासणी, त्वचेची तपासणी यासारख्या दहा आजारांचा समावेश करण्यात आला आहे.

महिला आरोग्याची तरतूद करण्यासाठी हा उपक्रम
कोरोना काळात ऑक्सिजनची कमतरता हाेती. तेव्हा स्वस्ती फाउंडेशनने अकरा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर जिल्हा सर्वोपचार रुग्णालयास भेट दिले होते. अशा विविध माध्यमातून आरोग्याच्या सेवेत ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. आता सामान्य महिलांच्या आरोग्याची तरतूद करण्यासाठी हा अनोखा उपक्रम महाराष्ट्रात सुरू केला असून सोलापुरात याची सुरुवात झाली आहे.
रेणुका जाधव, क्रांती संघटना प्रमुख

बातम्या आणखी आहेत...