आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिका:जन्म-मृत्यूची माहिती 21 दिवसांत नाही आल्यास दवाखाने जबाबदार; महापालिका

सोलापूर17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिका जन्म-मृत्यू दाखला विभागाकडून वेळेत दाखला मिळत नसल्याची तक्रारी नागरिकांकडून येत आहेत. झोन कार्यालयात दाखला घेण्यासाठी गेल्यावर नोंद नाही, असे सांगण्यात येत असल्याने नागरिकांची धावाधाव होतो. त्यातून एजंटाकडे मार्ग वळतो आणि आर्थिक लूट सुरू होते. जन्म-मृत्यूची नोंद दवाखान्याकडून २१ दिवसांत होणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास दवाखान्यास जबाबदार धरण्यात येणार आहे. तसे परिपत्रक महापालिकेच्या वतीने काढण्यात येणार आहे.

घरात मृत्यू झाल्यास दाखला मिळवण्यासाठी नागरिकांना अडचणी येत आहेत. ऑनलाइन प्रक्रिया, स्मशानभूमी दाखला, डॉक्टर प्रमाणपत्र या प्रक्रिया आदी अडचणी समोर येत आहेत. महापालिका जन्म-मृत्यू विभागाकडून ११ प्रकारचे दाखले दिले जातात. ऑनलाइन पध्दतीने आतापर्यंत ४१ हजार २६ अर्ज आले. त्यापैकी ३० हजार ९ दाखले देण्यात आले. ८ हजार ७०७ दाखले नाकारण्यात आले. ४८४ जणांकडे अतिरिक्त कागदपत्रे मागितली. १८२६ दाखले प्रलंबित आहेत. प्रलंबित दाखल्याचे प्रमाण कमी करणे आणि दाखला जलदगतीने देण्यासाठी दवाखान्याकडून २१ दिवसांच्या आत नोंदी येणे आवश्यक आहे. तसे नाही झाल्यास दवाखान्यास जबाबदार धरण्यात येणार आहे. याबाबत त्यांना परिपत्रक काढून माहिती देण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली. ६०० नागरिकांच्या दाखल्याची वर्षाची मुदत संपणार होती. त्यांची माहिती डॉ. अरुंधती हरवाळकर यांनी मागवून घेऊन नागरिकांना दाखले दिले. त्यामुळे नागरिकांचे ९ लाख रुपये वाचल्याची माहिती त्यांनी दिली. जे नागरिक ऑनलाइन अर्ज करत नाहीत, त्यांची जबाबदारी पालिका कशी घेणार? असे त्या म्हणाल्या.

घरात मृत्यू झाल्यास अडचण : घरात मृत्यू झाल्यास डॉक्टरांचे प्रमाणपत्र आवश्यक केले. त्यामुळे नागरिकांना मृतदेह दवाखान्यात न्यावे लागते. डॉक्टर घरी येऊन तपासणी करण्यास वेळ लागू शकतो. खासगी जागेत अंत्यविधी केले तर त्या जागेचा उतारा किंवा नगरसेवकांचे पत्र आवश्यक आहे. ही सर्व प्रक्रिया करण्यास सुमारे महिना कालावधी लागू शकतो.

झोन कार्यालयासमोर रांग
दाखल्यासाठी झोन कार्यालयासमोर रांग लागलेली दिसून येते. डफरीन हॉस्पिटल येथे तशी स्थिती आहे. रांगेतील बहुतांश नागरिकांना नोंद नाही, अशी उत्तरे मिळतात. त्यामुळे नागरिकांची धावपळ सुरू होते.

बातम्या आणखी आहेत...