आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Solapur
  • If Educational Power Is Not Used For Human Welfare, Its Value Is Nil; Padma Shri At The Hands Of Governor Arif Khan. Honor Of The Pandavas |marathi News

गौरव समारंभ:शैक्षणिक शक्तीचा मानवी कल्याणासाठी उपयोग न केल्यास त्याची किंमत शून्यच; राज्यपाल आरिफ खान यांच्या हस्ते पद्मश्री डॉ. पांडव यांचा सन्मान

सोलापूर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कार्यक्षमता, कर्तृत्व पाहून डॉ. चंद्रकांत पांडव यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यांनी निरपेक्ष भावनेने रुग्णांसह देशसेवा केली आहे. त्यांचे कार्य, सहानुभूती व विश्वासाची किंमत कोणीच मोजू शकत नाही. शिक्षणापासून मिळणाऱ्या ताकदीचा मानवाच्या कल्याणासाठी उपयोग करावा, अन्यथा त्याची किंमत शून्य असल्याचे प्रतिपादन केरळचे राज्यपाल डॉ. आरिफ मोहम्मद खान यांनी केले.

गुरुवारी (दि. ५) येथील देशभक्त संभाजीराव गरड बहुउद्देशीय संस्था व पद्मश्री डॉ. चंद्रकांत पांडव नागरी सत्कार समितीने पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. चंद्रकांत पांडव यांचा गौरव केला. स्वातंत्र्यसेनानी संदिपान गायकवाड सभागृहात राज्यपाल खान यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन हा गौरव करण्यात आला. तसेच वैद्यकीय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्याबद्दल कै. डॉ. वसंतराव गरड स्मृतिनिमित्त दिल्या जाणाऱ्या धन्वंतरी पुरस्काराने डॉ. नितीन तोष्णीवाल, डॉ.फहिम गोलीवाले यांना गौरविण्यात आले. यावेळी ते बोलत होते. डॉ. पांडव यांच्याकडून शिकायला हवे, अशा शब्दांत राज्यपाल डॉ. खान यांनी त्यांचा गौरव केला. सभ्य जीवन जगताना करूणाभाव जपावा. मनुष्याकडे परंपरा, मूल्ये नसल्यास तो दानव बनेल. शिक्षक, डॉक्टरांचे काम अतुलनीय आहे. कोरोना काळात डॉक्टरांनी जीवाची पर्वा न करता मानवतेची सेवा केली. मानवसेवा, करुणाभाव, परंपरा, मूल्यांची जपणूक यांचा अंगीकार करावा, हे सांगताना त्यांनी विविध संस्कृत श्लोक, सुभाषिते सांगितली. ज्यांचा स्वभाव आहे शांत, तेच आहेत आपले पांडव चंद्रकांत अशा कवितेने सुरुवात करत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले म्हणाले, एम्समध्ये हजारो रुग्णांना बरे करण्याचे काम त्यांनी केले. पद्मश्री पुरस्काराने त्यांचा सन्मान हा खूप मोठा गौरव आहे. त्यांच्या गावात झालेल्या त्यांच्या सत्काराला आगळेवेगळे महत्त्व आहे. अध्यक्षस्थानी बाबासाहेब क्षीरसागर होते.

यावेळी व्यासपीठावर पद्मश्री डॉ. मदन गोडबोले, राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर मुळे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, माजी आमदार राजन पाटील, कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, प्रांताधिकारी गजानन गुरव, तहसीलदार प्रशांत बेडसे, संस्थेचे अध्यक्ष प्रतापसिंह गरड यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दीपक गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील, सतीश काळे, गोविंद कुलकर्णी, मंगेश कराड, श्याम रघुनंदन, अनिल घनवट, शाम रघुनंदन, प्रविणसिंह गरड, अंजली बोरकर, डॉ. रूपाली बाबुर्डीकर, डॉ. सोनाली पांडव -खके, संजय क्षीरसागर, पद्माकर देशमुख, राजाभाऊ सरवदे, हनुमंत कसबे, जयश्री पाटील, बळवंत कोहली, अरुण पाटील आदी उपस्थित होते. प्रास्ताविक बाजीराव जोशी यांनी केले. सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले. बाबासाहेब क्षीरसागर यांनी आभार मानले.

ट्रामा केअर सेंटरसाठी प्रयत्न करू
डॉ. कौशिक गायकवाड यांनी मोहळमध्ये ट्रामा सेंटर मंजूर व्हावे, आयुर्वेदिक वनस्पती संशोधन केंद्र उभारावे, मोहोळ, वडवळ देवस्थानला हेरिटेज सेंटर व्हावे, अशी मागणी केली. सत्काराला उत्तर देताना डॉ. चंद्रकांत पांडव म्हणाले, या सत्काराच्या निमित्ताने मी भीष्म प्रतिज्ञा करतो की, रुग्णांना अद्ययावत उपचार मिळण्यासाठी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या माध्यमातून माझ्या मामाच्या गावात सर्वसोयींनी युक्त ट्रामा सेंटर, मोहोळ व वडवळच्या नागनाथ मंदिराला वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू. पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल २९ ठिकाणी सत्कार झाले. परंतु हा अविस्मरणीय आहे.

दुसऱ्यांसाठी प्रार्थना करा, चांगले होईल
राज्यपाल डॉ. आरिफ मोहम्मद खान यांनी श्री नागनाथ मंदिर व जामा मशिदीला भेट देऊन दर्शन घेतले. दोन्ही धार्मिक स्थळांची माहिती घेतली. श्री सद्गुरु नागनाथांच्या दर्शनानंतर मंदिराच्या विश्वस्तांनी नागेश संप्रदायासह हेमाडपंथी मंदिराच्या रचनेची त्यांना माहिती दिली. तसेच त्यांचा सत्कार केला. जामा मशीदीत मुस्लिम समाजबांधवांशी संवाद साधताना म्हणाले, तुम्हाला तुमच्यासाठी नव्हे तर लोकांच्या सेवेसाठी बनवले आहे. स्वतः बद्दल बोलू नका, दुसऱ्यांसाठी प्रार्थना करा, देव तुमचे चांगले करेल. तसेच मी सदिच्छा भेट दिली, मला येथे येऊन आनंद झाला, असे तेथील नोंदवहीत उर्दू व हिंदीमध्ये लिहून त्यांनी स्वाक्षरी केली.

बातम्या आणखी आहेत...