आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका केवळ राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीच्या चुकीच्या निर्णयामुळे लांबणीवर पडल्या. चूक दुरुस्तीचे काम शिंदे-फडणवीस सरकारने केले, पण त्याला राष्ट्रवादीने न्यायालयात आव्हान दिल्याने निवडणुका रखडल्या. त्यांनी याचिका मागे घेतली. आम्ही उद्याच निवडणुकीला तयार आहाेत, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.
त्याला प्रत्युत्तर देताना याचिकाकर्ते, राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी बावनकुळे निवडणुकांना घाबरत असल्यानेच दिशाभूल करणारी वक्तव्ये करत असल्याचा आरोप प्रत्युत्तरात केला.
बावनकुळे म्हणाले की, २०११ ची जनगणना गृहीत धरूनच प्रभाग रचना करायला हवी हाेती, पण मविआने प्रभाग वाढवून ठेवले. शिंदे-फडणवीस सरकारने त्यात दुरुस्ती केली, पण त्याला राष्ट्रवादीने आव्हान दिले आहे. उद्धव ठाकरे रडोबा नेते : बाळासाहेब ठाकरे लढवय्ये नेते हाेते. उद्धव ठाकरे रडाेबा नेते आहेत. ४० आमदार सोडून गेले त्याच दिवशी त्यांचा पराभव झाला आहे. स्वतःच्या सोयीने निकाल लावून सांगणाऱ्या उद्धव ठाकरेंकडून न्यायालयाचा अवमान होत आहे. भाजप या सर्व क्लिप आणि माहिती गोळा करून अवमान याचिका दाखल करेल. उद्धव यांनी सांगितलेली अनेक कामे मातोश्रीपर्यंत फडणवीसांनी पोहोचवली, असेही बावनकुळेंनी सुनावले.
राऊतांचा साबण काँग्रेसचा, पावडर राष्ट्रवादीची : संजय राऊत काँग्रेसच्या साबणाने अंघाेळ करतात. राष्ट्रवादीची पावडर आणि शरद पवारांचा टिळा लावतात. आगामी अर्थसंकल्पानंतर उद्धवसेना, राष्ट्रवादीतील अनेक जण भाजपत दाखल होतील, असा दावा बावनकुळेंनी केला.
सरकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी निवडणुका लांबल्या : जगताप
गेल्या दहा महिन्यांपासून राज्य सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग रचनेसंदर्भातील प्रतिज्ञापत्र दाखल करत नसल्याने निवडणुका लांबल्या आहेत. मविआकडून पराभव होण्याच्या भीतीने सरकार प्रतिज्ञापत्र दाखल करत नाही, पण जनतेची दिशाभूल करण्यासाठी बावनकुळे काहीही वक्तव्ये करत आहेत. रेटून खोटे बोलण्याची भाजपची नीती आहे, असे याचिकाकर्ते प्रशांत जगताप यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.