आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआपल्या मालकीच्या वाहनाचा रंग खराब झाला असेल आणि तो बदलून घ्यायचा असेल तर आरटीओकडून रीतसर परवानगी घेणे गरजेचे आहे. असे आदेशच उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने जारी केले आहेत. अन् जर तसे केले नाही तर दोन हजार रुपये दंड भरावा लागेल. आरटीओकडून दुचाकीला २०० रुपये, चारचाकीला ४०० रुपयांपर्यंतचे अल्ट्रेशन शुल्क भरून परवानगी घ्यावी लागते. अन्यथा ही कारवाई निश्चित आहे, अशी माहिती सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अमरसिंह गवारे यांनी दिली आहे.
बऱ्याचदा अनेक जण आपल्या वाहनाचा रंग उडायला लागला हे लक्षात आल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या रंगांची निवड आपल्या कारला नवीन दिसण्यासाठी करतात. मात्र असा परस्पर व्यवहार केला किंवा रंगकाम केले तर ते चांगलेच अंगलट येऊ शकणार आहे. असा कोणताही बदल न करता आरटीओची परवानगी घेऊन मगच अशा पद्धतीचा बदल करण्यात यावा, असा आदेशच आरटीओने काढला आहे.
विमा करताना येऊ शकते अडचण अनेकजण आपल्या वाहनाचा रंग उडाला म्हणून रंग बदलत असतात, परंतु जेव्हा तपासणी होते. त्यावेळी मूळ रंग न दिसल्यास आरटीओ अधिकारी संबंधित वाहनचालक मालकावर कारवाई करू शकतात. त्यामुळे परवानगी घेऊनच रंग द्यावा. आवश्यक शुल्क आकारून रीतसर परवानगी घेतल्यानंतरच आपल्याला त्या वाहनाचा रंग बदलता येतो. परवानगी न घेता रंग बदलल्यास कारवाई केली जाऊ शकते. आपण जर परस्पर वाहनांचा रंग बदलला तर वाहनाची विक्री करताना किंवा वाहनाचा विमा करताना मोठी अडचण येऊ शकते. वाहनात बदल करायचे झाल्यास परवानगी घेणे गरजेचे आहे.
बदल करायचा असेल तर परवानगी घ्या तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या वाहनामध्ये जर बदल करायचा असेल तर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून परवानगी पत्र घेणे आवश्यक आहे. त्यानुसार जर बदल केला तर कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नाही. मात्र जर परस्पर बदल केला तर त्यावर कारवाई होणार आहे. -अमरसिंह गवारे, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.