आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्युत बॉक्स:स्ट्रीट बाजारात उघड्या विद्युत बॉक्सना पत्रा लावून त्यावर चिकटपट्टीचे ठिगळ ; दुरुस्त करण्याची तसदी

सोलापूर9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराचे सौंदर्य वाढवण्यासाठी स्मार्ट सिटी याेजना राबवली गेली. यातून होम मैदानालगत आकर्षक स्ट्रीट बाजार बनवण्यात आला. यावर लाखो रुपये खर्च झाले. पण तेथील दुरुस्ती व देखभाल करण्यात स्मार्टपणा दिसण्याऐवजी अडाणीपणा दिसत आहे. पथदिव्यांचे उघडे स्विच बॉक्स दुरुस्त करताना पत्रा लावून चिकटपट्टी गुंडाळली आहे. स्विच बॉक्स नट बोल्टने दुरुस्त करण्याची तसदी घेतली गेली नाही. शहरातील उघड्या स्विच बॉक्समधील विद्युत तारांचा धक्का लागून निष्पापांचा जीव गेला आहे. तरी महापालिकेचा बेजबाबदारपणा कमी झालेला नाही. स्ट्रीट बाजारमधील पथदिव्यांचे स्विच बॉक्स उघडे असल्यामुळे त्यातील विजेच्या तारांचा धक्का लागून अपघात होण्याची शक्यता आहे. दिव्य मराठीतून याबद्दलच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. पण त्यावर महापालिकेने चिकटपट्टी लावून मलमपट्टी केल्याचे दिसत आहे.

रोज सायंकाळी येथे लहान मुलांची मोठी गर्दी असते. चुकून चिकटपट्टी निघाली तर पुन्हा विजेच्या तारा उघड्या पडतील आणि हे धोकादायक ठरू शकते. याबाबत महापालिकेचे सहाय्यक आयुक्त विक्रम पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

गाळ्यांचा तिसऱ्यांदा लिलाव

होम मैदानालगत असलेल्या स्ट्रीट बाजारातील काही गाळ्यांचा लिलाव महापालिकेच्या वतीने करण्यात येणार आहे. लिलाव करण्याची ही तिसरी वेळ आहे. तेथे २० स्टॉल उभारले आहेत. त्यापैकी ७ स्टॉल गारमेंट, हातमाग कापड यांच्यासाठी, ३ स्टॉल ज्वेलरी, ५ स्टॉल कला कुसरीच्या वस्तूंसाठी, ५ स्टॉल बंद पाकीट खाद्य पदार्थांसाठी तर ३२ जागा खाद्यपदार्थ विकाणाऱ्या गाड्यांसाठी असणार आहेत. एक गाळा दिव्यांग व्यक्तीसाठी आरक्षित आहे. खाद्यपदार्थ विकणाऱ्यांना दरमहा ६२४१ रुपये भाडे असणार आहे. ६ व ७ नंबरच्या स्टॉलची ऑफलाइन लिलाव प्रक्रिया करण्यात येणार आहे. यात भाग घेण्यासाठी प्रवेश शुल्क ५०० रुपये असेल, अशी माहिती महापालिकेने दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...