आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानांदेड, हिंगोली, यवतमाळ येथील आलेल्या १३७ वारकऱ्यांना भगर व आमटी खाल्ल्याने विषबाधा झाली. संत निळोबा महाराज सेवा मंडळ, त्यागमूर्ती बबन महाराज भक्त सदनात वारकरी थांबले होते. बुधवारी (१ फेब्रुवारी) रात्री फराळात भगर व आमटी खाल्ली होती. त्यानंतर त्यांना त्रास सुरू झाला. सर्वांवर उपचार सुरू असून, प्रकृती स्थिर आहे, असे प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी सांगितले. अन्न व औषध प्रशासनाने नमुने घेतले आहेत.
बुधवारी रात्री भगर-आमटी खाल्ल्याने भाविकांना उलटी, मळमळ, पोटदुखी, चक्कर येणे असा त्रास होऊ लागला. सर्वांना तत्काळ पंढरपुरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. माघी एकादशीनिमित्त पंढरपूर येथील संत निळोबा महाराज मठात नांदेड, हिंगोली, यवतमाळ जिल्ह्यातून १५० वारकरी आले होते. मंठा ते पंढरपूर अशी दिंडी मागील २५ वर्षांपासून येते. बुधवारी रात्री आठ वाजता फराळ करताना भगर, आमटी हे पदार्थ खाल्ल्याने भाविकांना अन्नातून बाधा झाली. जेवणातील सर्व पदार्थांचे नमुने अन्न व औषध प्रशासन विभागाकडून घेण्यात आले असून, ते नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. गुरुवारी दुपारी उपचार घेत असलेल्या भाविकांची प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. या वेळी त्यांच्यासमवेत तहसीलदार सुशील बेल्हेकर, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, मुख्याधिकारी अरविंद माळी, अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त सुनील जिंतूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बागडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय पाटील, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश माने, तालुका आरोग्याधिकारी डॉ. एकनाथ बोधले उपस्थित होते.
उघड्यावरील पदार्थ खाऊ नका ^भगर व आमटी खाल्ल्याने त्रास झाला होता. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर आहे. अन्न पदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तत्काळ दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासनाला दिले आहेत. वारी कालावधीत नागरिकांनी व भाविकांनी उघड्यावरील पदार्थ खाऊ नयेत. -गजानन गुरव, प्रांताधिकारी, पंढरपूर
अहवालानंतर माहिती कळेल ^भगर व आमटी खाल्ल्याने ही घटना घडली आहे. शिजवलेली भगर व कच्ची भगर तसेच त्या मठातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. अहवाल आल्यानंतरच कशामुळे हे झाले ते सांगता येईल. भगर हा नेहमी आहारात वापरला जाणारा पदार्थ आहे. त्यामुळे भगर खाल्ल्याने असा त्रास होतो, असे नाही. अहवाल आल्यानंतर सांगता येईल. -सुनील जिंतूरकर, सहायक आयुक्त
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.