आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासांगोला येथील बाह्यवळण कामांत गैरप्रकार झाला असून, १७० एकर जमिनीची मोजणी न करताच शेतकऱ्यांना अंदाजेच नुकसान भरपाईचे वाटप करण्यात आले आहे. या गैर प्रकारांमध्ये राज्य व केंद्र शासनाच्या सेवेत असणाऱ्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांसह, महामार्गाच्या मंजुरी प्रक्रियेतील सहभागी अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी केंद्र शासनाकडे पुरावे, कागदपत्रांसह करणार असल्याचे किसान आर्मी आणि वॉटर आर्मीचे संस्थापक प्रफुल्ल कदम यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केेले.
श्री. कदम म्हणाले, “रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग (एनएच १६६) अंतर्गत सांगोला बाह्यवळण मार्गात ३ ए नंतर ३ ‘बी’ ची प्रक्रिया, त्यामध्ये शासकीय मोजणी करणे अपेक्षित असते. त्या प्रक्रियेत किती क्षेत्र जाणार, कोणाला किती नुकसानभरपाई देण्यात येणार या बाबी स्पष्ट होतात. पण, येथील प्रक्रियेत ‘३ बी’ न करता, अधिकाऱ्यांनी त्यांच्या सोईने नुकसान भरपाई रक्कम वाटप केली आहे. रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील सांगोला बाह्यवळण मार्गासाठी राष्ट्रीय महामार्ग कायदा १९५६ नुसार ३ ए (१) ची अधिसूचना ३१ जानेवारी २०१८ रोजी केंद्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध झाली होती. ४ मार्च २०१८ रोजी ३ ए (३) ची अधिसूचना वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर कायद्यानुसार ३ बी म्हणजे जमिनीचा प्रत्यक्ष सर्व्हे, संयुक्त मोजणी, पंचनामा, निशाणी, खुणा, मुल्यांकन इत्यादी बाबी होणे बंधनकारक होते. पण, बेकायदेशीरपणा करीत बाह्यवळणापैकी तब्बल १७० एकर जमिनीचा ३ बी न करताच १८ जून २०१८ रोजी ३ ‘डी’ प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक बाधित शेतकऱ्यांवर मोठा अन्याय व फसवणूक झाली आहे.
चुकीच्या पद्धतीने काही मूठभर लोकांच्या आर्थिक लाभासाठी बेकायदेशीर फसवणुकीचा प्रकार, त्याकडे करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी कदम यांनी केली. या पत्रकार परिषदेस संजय पवार, प्रकाश सोळसे, अमोल पाटील आदी उपस्थित होते. संदर्भात मंगळवेढा-सांगोलाचे प्रांताधिकारी अप्पासाहेब समिंदर यांना विचारले असता, तो प्रकार २०१८ दरम्यानची आहे. मी सन २०२१ मध्ये प्रांत कार्यालयाचा पदभार घेतल्याचे त्यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.