आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इकडे सीमावाद, तिकडे कानडीत घुमतोय महाराष्ट्राचा आवाज:सीमाभागातील गावांत कन्नड नाटकांना नाट्यप्रेमींचा भरभरून प्रतिसाद

रामेश्वर विभूते | सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पेटलेला असताना सीमाभागातील गावांत काय चित्र असेल, असा प्रश्न दोन्ही राज्यांत पडत असेल. परंतु, एकीकडे हा वाद सुरू असताना दुसरीकडे कलेच्या नात्याचे दोन्ही राज्यांतील बंध मात्र अजूनही अतूट आहेत. सीमा भागातील तोळणूर गावचा (ता. अक्कलकोट, महाराष्ट्र) एक अंध कलावंत रेवणसिद्ध फुलारी सध्या कर्नाटकात एका कन्नड भाषिक प्रतिष्ठित वाहिनीवर चांगलाच गाजतो आहे. दुसरीकडे, यात्रा, जत्रा आणि उरुस या निमित्ताने आयोजित कन्नड नाटकांनाही सीमा भागांतील गावांत प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. गाव कोणते आणि राज्य कोणते, हा विचारही या कलाप्रेमींना शिवत नाही.

नाट्यरसिकांनाही कन्नड नाटकांची पर्वणी
दिवाळीपासून नाटकांचा हंगाम सुरू झाला असून काशिलिंग जेऊर येथे येच्चरा तंगी येच्चरा (जागी रहा पोरी जागी रहा), रत्नमांगल्य, ई कुसू यारदू (हे बाळ कोणाचे), मैंदर्गी येथे मुरू दिनद संते (तीन दिवसांचा बाजार)अशा कन्नड नाटकांचे प्रयोग झाले. आता हालहळ्ळी (अ), तीर्थ, दोड्याळ, गळोरगी, चपळगाववाडी अशा गावांतही मोठ्या प्रमाणात नाट्यप्रयोग होत आहेत. मैंदर्गी (ता. अक्कलकोट) येथील नाट्य कलावंत उमा सागर यांना कर्नाटक सरकारने मानाचा चिंदोडीलीला दत्त पुरस्कार देऊन नुकतेच गौरवले. त्यांचे नाट्यप्रयोग मराठी मुलुखात होत असतानाही त्यांना कर्नाटक सरकारने जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला आहे.

कन्नड वाहिनीवर रेवणसिद्धचे कौतुक
कर्नाटकात एका प्रतिष्ठित वाहिनीवर गायनाच्या स्पर्धात्मक कार्यक्रमात महाराष्ट्राचा अंध गायक रेवणसिद्ध फुलारी भाषा बांधव्य जपत कन्नड गीतांच्या माध्यमातून जगभरातील रसिकांचे मनोरंजन करत आहे. त्याला या वाहिनीच्या वतीने तसेच अभिनय सम्राट शिवराजकुमार यांच्या वतीने बक्षिसेही देण्यात आली.

कलेला जात, भाषा नसते
अखंड भारताची संकल्पना कलावंत मानतात. राजकारणासाठी भाषा, सीमावाद पेटवून भाषांमधील बांधव्याला तडे जाऊ देऊ नये. जातीपातीनंतर आता सीमावादात अडकवण्याचा प्रयत्न होऊ नये.
-स्वप्ना सागर, कन्नड नाट्य अभिनेत्री, विजयपूर

प्रांत व भाषावाद चुकीचाच
कला आणि भावनेला भाषा नसते. ती व्यक्त करण्यासाठी भाषेची गरज असते. देशात अखंड संस्कृतीचे दर्शन घडते. याला स्वार्थासाठी कलंक लावू नये. प्रांत, भाषावाद चुकीचा आहे.
-महांतेश पुजारी, नाट्य कलावंत, जेऊर

सीमाभागातील लेखकांचेही कौतुक
कर्नाटक-महाराष्ट्र सीमा भागात अनेक कन्नड साहित्यिक आहेत. मैंदर्गीचे साहित्यिक गिरीश जकापुरे यांच्या नावावर ५० हून अधिक कन्नड पुस्तके आहेत. ती कर्नाटक साहित्य अकादमीबरोबरच कर्नाटकातील नामवंत प्रकाशकाची आहेत. हालहळ्ळीचे एच. जगन्नाथ यांचे कन्नड नाटकाचे पुस्तक कर्नाटक सरकारच्या यादीत आहेत. याशिवाय मधुमालाताई लिगाडे, तडवळेचे उपप्राचार्य सिद्रामप्पा करजगी, तीर्थचे सुभाष फताटे, सोमशेखर जमशेट्टी, मलिकजान शेख यांची नावे कन्नड साहित्य क्षेत्रात आवर्जून येतात. याशिवाय आंदेवाडीचे लोककलावंत गीतकार गैबीसाहब मकानदार यांचे साहित्यही दोन्ही राज्यांत प्रसिद्ध आहे.

बातम्या आणखी आहेत...