आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:पूर्वभागात यंत्रमागांची धडधड बंद, साडेपाच कोटींची उलाढालच ठप्प; जिल्हाधिकारी, मनपा कार्यालयास निवेदन

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सूत दरवाढ अन् महापालिकेच्या तोकड्या सुविधांकडे लक्ष वेधले

सूत दरवाढ आणि महापालिकेच्या तोकड्या सुविधांकडे लक्ष वेधण्यासाठी यंत्रमागधारक संघाने सोमवारी एक दिवसाच्या उत्पादन बंदची हाक दिली होती. त्याला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. अक्कलकोट रस्ता एमआयडीसीसह नागरी वसाहतीतल्या कारखान्यांतील यंत्रमागांची धडधड बंद होती. सुमारे साडेपाच कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाल्याचा अंदाज आहे. दुसरीकडे हे आंदोलन बेकायदा असल्याचे सांगत माकपने कामगारांना भरपाई देण्याची मागणी केली. मनसेप्रणीत कामगार संघटनेने मात्र कारखानदारांना पाठिंबा दिला. तसे निवेदन जिल्हा प्रशासनाला दिले.

संघाच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांना भेटून निवेदन दिले. कापसाच्या निर्यातीवर निर्बंध नाही, हमीभावापेक्षा जादा दराने खरेदी झाली. व्यापाऱ्यांनी साठेबाजी केली. त्याचा थेट परिणाम सूत उत्पादनावर झाला. सुताचे दर वाढले. यंत्रमागधारक अडचणीत आले. या प्रकारात शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, मार्ग काढावा, असे कारखानदार म्हणाले. या वेळी संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम, उपाध्यक्ष बसवराज बंडा, सचिव राजू राठी, खजिनदार अंबादास बिंगी आदी उपस्थित होते. याच शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांना भेटून निवेदन दिले. रस्ते, पाणी, पथदिव्यांचा प्रश्न मांडला. सर्व प्रश्नांवर लवकरच मार्ग काढण्याचे आश्वासन मिळाले.

सूतरंगणीचे पाणी टँकरद्वारेच; कामगारांना प्यायला पाणी द्या
मागण्यांचे निवेदन दिल्यानंतर शिष्टमंडळाची आयुक्त पी. शिवशंकर यांच्यासमवेत चर्चा झाली. अक्कलकोट रस्ता एमआयडीसीतील कारखानदार सूतरंगणीसाठी टँकरद्वारे पाणी घेतात. या पाण्याची घनता अधिक असल्याने त्यावर रासायनिक प्रक्रिया करावी लागते. त्याने उत्पादनाचा खर्च वाढला. महापालिकेने पाणी द्यावे, यासाठी आग्रही मागणी केली. किमान कामगारांना प्यायला तरी पाणी द्या, अशी मागणी श्री. गड्डम यांनी केली. नागरी वसाहतमधील कारखानदारांचे प्रश्नही त्यानी मांडले. एमआयडीसीतील रस्त्यांची झालेली चाळण, पथदिवे नसल्याने अंधार अशा वातावरणात उत्पादन घ्यायचे कसे? असा प्रश्न केला.

कामगारांना भरपाई द्या, सीटूच्या सभेत मागणी कारखानदारांच्या आंदोलनाला सीटूने विरोध केला. सुनील नगर येथे झालेल्या सभेत ज्येष्ठ कामगार नेते नरसय्या आडम म्हणाले, ‘‘केंद्राच्या धाेरणामुळे कापूस निर्यात आणि सुताच्या दरवाढीचा प्रश्न निर्माण झाला. त्याच्या विराेधात मालक आणि कामगार यांच्या संयुक्त लढ्याची गरज आहे. त्यासाठी कामगारांना विश्वासात घ्यावे लागेल. सोमवारचा बंद हा कारखानदारांचा एकतर्फी निर्णय आहे. कामगारांना मात्र त्याची भरपाई द्यावी लागेल.’’ सीटूचे राज्य महासचिव अॅड. एम. एच. शेख यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली.

बातम्या आणखी आहेत...