आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहणी:संनियंत्रण समितीकडून चारपैकी एकाच साठ्याची पाहणी; तीही उपसा नसलेल्याची, उच्च न्यायालयाच्या आदेशाने घोडेश्वर -तामदर्डी येथे वाळू ठिकाणांची पाहणी

मंगळवेढा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १४ मे रोजी घोडेश्वर-तामदर्डी साठा क्रमांक एक येथील वाळू उपसा स्थळाची पाहणी करण्यासाठी संनियंत्रण समिती येणार असल्याची कुणकुण वाळू तस्कारांना आधीच लागली. या परिसरात एकही वाहन, उपशाची साधने किंवा कामगार दिसणार नाही अशी व्यवस्था अवैध वाळू तस्करांच्या पाठीशी असणाऱ्या यंत्रणेने केल्याचे शनिवारी निदर्शनास आले.

स्थानिक पोलिस व महसूल प्रशासनाने खबरदारी म्हणून सर्वसामान्य नागरिकांना नदीपात्रात जाण्यापासून पहाटेपासून रोखण्यात आले होते. नदीपात्राच्या जवळ रस्त्यावरच जेसीबीने चर मारून रस्ता बंद करण्यात आला होता. त्यामुळे केवळ चालत जाणे शक्य होते. पत्रकारांनाही नदीपात्रात न्यायालयीन बाब असल्याचे सांगत समितीचे सदस्य परत जाईपर्यंत रोखण्यात आले.

निर्ढावलेल्या महसूल व पोलिस प्रशासनाने बघ्याची भूमिका घेतल्यामुळे भीमा नदीपात्रात बेसुमार अवैध वाळू उपसा सुरू आहे, याबाबतची जनहित याचिका ज्ञानेश्वर माने यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. समितीने केवळ एकाच वाळू साठा स्थळी भेट दिली. इतर ठिकाणी पाहणी करण्याचे टाळल्याचे दिसले. समितीने स्थानिक नागरिक, शेतकऱ्यांची मते घेतली नाही.

समितीने चारही वाळू साठ्याची पाहणी करणे अपेक्षित होते. मात्र घोडेश्वर येथील साठा क्रमांक एक “चौधरी पावर प्रोजेक्ट’च्या ठिकाणी नदीपात्रात भेट देऊन पाहणी केली. विशेष म्हणजे तेथे एक ब्रास देखील वाळूची विक्री केलेली नाही. इतर ठिकाणी प्रचंड प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू आहे.

पथक येणार असल्याची पूर्वकल्पना असल्याने शेकडो अवैध वाळू उपसा करणाऱ्या वहानांपैकी एकही टिप्पर शनिवारी रस्त्यावर दिसला नाही. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा पोकलेन मशिनच्या साह्याने केल्याचे समिती सदस्याच्या निदर्शनास आले आहे. पोकलेन मशीन नदी पात्राच्या लगत उभ्या होत्या. नदीपात्राच्या बाजूलाच अवैध वाळू उत्खननाचे खड्डे निदर्शनास आले आहेत. परंतु याबाबतीत समितीने बोलण्यास स्पष्ट नकार दिला. उच्च न्यायालयात अहवाल सादर करण्यात आल्यानंतर सर्व बाबी पुढे येणार आहेत, असे सांगण्यात आले.

वाळू तस्करांनी ज्वारीच्या कडब्याच्या पेंढ्याखाली वाळू उपसा करण्याचे “यारी’चे लोखंडी पार्ट लपवून ठेवण्यात आले होते.लोकांच्या मनातही वाळू तस्करांमुळे भितीचे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे माहिती सांगण्यास नागरिक धजावत नाहीत.

बातम्या आणखी आहेत...