आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनामुळे गणेशोत्सवातही बदल:पहाटे 4:50 पासून दुपारी दीडपर्यंत कधीही करा श्रीगणेशाची प्रतिष्ठापना

सोलापूरएका वर्षापूर्वीलेखक: अश्विनी तडवळकर
  • कॉपी लिंक

सर्वत्र मंगलमय वातावरण घेऊन येणाऱ्या श्रीगणेशाच्या स्वागतासाठी सर्वजण उत्सुक झाले आहेत. यंदा (दि. १० सप्टेंबर) शुक्रवारी श्रीगणेश चतुर्थीदिनी गणपतीची घरी पहाटे ४:५० पासून दुपारी १:५० पर्यंत कधीही प्रतिष्ठापना करू शकताे, अशी माहिती दाते पंचांगकर्ते ओंकार दाते यांनी दिली. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेश चतुर्थी साजरी केली जाते. पार्थिव गणेश स्थापना करण्याचा भाद्रपद शुद्ध चतुर्थी हा एकच दिवस असल्याने त्या दिवशी जमले नाही तर पुढे कोणत्याही दिवशी स्थापना करता येत नाही. एखाद्या वर्षी काही कारणाने लोप झाल्यास पुन्हा पुढील वर्षी गणपती पूजन करता येते.

दुकानातून गणपतीची मूर्ती ८-१५ दिवस आधी आणून घरामध्ये ठेवता येते. श्रीगणेश चतुर्थीच्या आधी एक दिवस किंवा त्याच दिवशी सकाळी मूर्ती आणावयास पाहिजे असे काही नाही. पार्थिव गणेश स्थापना व पूजन करण्यासाठी विशिष्ट मुहूर्त नाही. प्रात:कालापासून मध्यान्हापर्यंत कोणत्याही वेळी स्थापना व पूजा करता येईल.

त्यासाठी विशिष्ट नक्षत्र, योग, विशिष्ट करण इ. वर्ज्य नाहीत म्हणून ते पाहू नयेत. अनेक जण दरवर्षी उत्सवासाठी आपल्या गावी जात असतात. या वर्षी त्यांना गावी जाणे शक्य नसल्यास त्यांनी राहत्या घरी वरीलप्रमाणे गणेशोत्सव करून आपली गणेशपूजनाची परंपरा अखंडित ठेवावी. या वर्षी कोरोना संकटामुळे ज्याप्रमाणे अनेक बदल आपण अंगीकारले त्याप्रमाणे गणेश उत्सवातसुद्धा आपणास बदल करावा लागेल, असेही त्यांनी सांगितले.

घरामध्ये गर्भवती स्त्री असतानाही गणपती विसर्जन करावे
घरामध्ये गर्भवती स्त्री असताना काही कुटुंबे गणेशमूर्तीचे विसर्जन करत नाहीत. ही प्रथा चुकीची आहे. ही प्राणप्रतिष्ठा करून बसवलेली मूर्ती उत्तरपूजा करून देव्हाऱ्यातून खाली काढतात व तिचे पाण्यात विसर्जन करतात. वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करण्याची गरज नसून पाण्यातही विसर्जन करता येते. त्यामुळे तलावात किंवा स्वतंत्र टँकमध्ये, मोठ्या बादलीमधील पाण्यातसुद्धा विसर्जन करता येते. विसर्जनानंतर ती मूर्ती विरघळणे आवश्यक असल्याने शाडूची किंवा मातीची मूर्ती असावी, असेही दाते यांनी सांगितले.

असे असेल गौराईचे आगमन
१२ सप्टेंबर २०२१, रविवार गौरी आवाहन : सकाळी ९:५० नंतर परंपरेप्रमाणे गौरी आवाहन करावे. १३ सप्टेंबर २०२१, सोमवार रोजी गौरीपूजन करावे. १४ सप्टेंबर २०२१ मंगळवारी गौरी विसर्जन सकाळी ०७:०५ नंतर गौरी विसर्जन करावे. मंगळवार असला तरीही गौरी विसर्जन परंपरेप्रमाणेच करावे, अशीही माहिती ओंकार दाते यांनी दिली. दरम्यान, यंदा कोरोनामुळे अनेक निर्बंध असले तरी राज्यभरातील भाविकांची उत्साह हा कमी झालेला नाही. त्यामुळेच गणपती आणि गौराईच्या आगमनाची उत्सुकता आहे. राज्यातील सजावट आणि मूर्तीचे दुकाने ही सजली आहेेत.

बातम्या आणखी आहेत...