आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोरखेळ:परीक्षा तिसऱ्यांदा पुढे ढकलण्याची विद्यापीठावर ओढावलीय नामुष्की ; स्वीकारली बहुपर्यायी प्रश्न पद्धती

सोलापूर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या कारभार म्हणजे पोरखेळ होऊन बसला आहे. दोन दिवसांवर आलेली परीक्षा शनिवारी तिसऱ्या वेळेस पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे परीक्षा विभागाची नाचक्की झाली आहे. २० जूनपासूनच्या परीक्षा आता १४ जुलैपासून घेण्याचे विद्यापीठाने जाहीर केले आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या हितापेक्षा विद्यार्थी संघटांपुढे मान तुकवत बहुपर्यायी प्रश्न पद्धतीनुसार परीक्षा घेण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. यामुळे विद्यार्थी आणि पर्यायाने विद्यापीठाची पत यावर नकारात्मक परीणाम होण्याची भीती शिक्षण वर्तुळातून व्यक्त होत आहे.

पदवी आणि पदव्युत्तर सर्व विद्याशाखांच्या सर्व सत्रांच्या परीक्षा विद्यार्थी संघटनांच्या मागणीनुसार आता बहुपर्यायी प्रश्नांद्वारे ऑफलाइन पद्धतीने १४ जुलै पासून सुरू होणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपूर यांनी दिली आहे. दरम्यान, संचालक पदावरील डॉ. गणपूर यांचा कारभार दिशाहीन असल्याचे वारंवार समोर येऊनही प्रशासन ढिम्म आहे. विद्यापीठात वारंवार आंदोलने होत आहेत. तरीही परीक्षा विभाग मौन आहे.

विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींनी विद्यापीठाकडे बहुपर्यायी प्रश्नांद्वारे परीक्षा घेण्याची मागणी केली होती. त्याचबरोबर परीक्षा पुढे ढकलण्याची मागणीही करण्यात आली होती. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठ प्रशासन प्रमुख अधिकारी आणि विद्यार्थी प्रतिनिधींची बैठक झाली. यात २० जूनपासून सुरू होणाऱ्या सर्व परीक्षा रद्द झाल्या आणि त्या १४ जुलैपासून घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

बहुपर्यायी प्रश्न पद्धतीसाठी प्रणिती शिंदे यांचा आग्रह : विद्यापीठाच्या परीक्षा बहुपर्यायी पद्धतीने घ्याव्यात यासाठी सोलापूर शहर युवक कॉंग्रेस व विद्यार्थी संघर्ष समितीने आंदोलन केले. शहर युवक काँग्रेस, विद्यार्थी संघर्ष समिती, प्रहार संघटना, यासह अन्य संघटनांनी विद्यापीठात आंदोलन केले. आमदार प्रणिती शिंदे यांनी परीक्षा पुढे ढकलून त्या बहुपर्यायी प्रश्न या पद्धतीने घेण्याची मागणी निवेदनाद्वारे कुलगुरू मृणालिनी फडणवीस यांच्याकडे केली होती. तसेच, उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याशी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करून मागणी केली. यावेळी युवक कॉंग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे, प्रहार संघटनेचे अध्यक्ष अजित कुलकर्णी, रुपेश गायकवाड, तिरुपती परकीपंडला, एनएसयूआय अध्यक्ष सुमित गडगी, सुनील सारंगी, योगेश मार्गम, विद्यार्थी प्रतिनिधी अभिषेक थोरात, संदीप क्षीरसागर यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...