आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहब्बू वस्तीकडून आवसे वस्ती आणि अमराईकडे जाणाऱ्या तीन रस्त्यांवरील चौकास जयभीम चौक नाव देण्याचा महापालिकेत ठराव झाला होता. तो बदलून तडीपार सचिन उर्फ बॉबी संभाजी शिंदे याचे नाव देत ‘बॉबी चौक’ असे नामकरण केले. त्यासाठी गेल्या वर्षी सभागृहात प्रस्ताव आणून या नामकरणास मान्यता दिली. या प्रकारामुळे महापालिकेच्या भोंगळ कारभाराचा एक नमुना समोर आला आहे.
अनेक गुन्हे दाखल असलेल्या तडीपार जिवंत व्यक्तीच्या टोपण नावाने चौकास नाव दिले. महापालिकेच्या भोंगळ कारभाराचा हा एक अजब नमुना समोर आला आहे. बॉबी चौक नामकरणाचा प्रस्ताव पालिका सभेपुढे २१ जानेवारी २०२२ रोजी आला होता. हब्बू वस्ती येथे सार्वजनिक ठिकाणी जयभीम चौक असे नाव असताना ते बदलून त्याच चौकाला बॉबी चौक असा फलक लावल्याची माहिती कळवणारा आर्ज ३० मार्च २२ रोजी पोलिसांकडे सादर झाला. हा निनावी अर्ज आल्यानंतर पोलिसांनी चौकाची पाहणी केली. संबंधित व्यक्तीची माहिती काढली. आलेल्या तक्रार अर्जासोबतची कागदपत्रे पाहता १८ जानेवारी २०२१ रोजी प्रस्ताव क्रमांक २१२ अन्वये तेथे जयभीम चौक मान्यता देण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्याच ठिकाणी बॉबी चौक नाव द्यावे, असा प्रस्ताव २१ जानेवारी २०२२ रोजी विषय क्रमांक ४३५ नुसार आला. बॉबी चौक नाव देण्यास व येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
जिवंत माणसाच्या नावाने चौक
महापालिकेच्या कारभाराचा अजब नमुना समोर आला आहे. जिवंत माणसाच्या आणि तेही तडीपार असलेल्या व्यक्तीच्या टोपण नावाने चौकास नामकरण करण्याचा प्रस्ताव पालिका सभागृहात आणला आणि तो मंजूर करून त्याची अंमलबजावणी केली. पोलिसांचे पत्र आल्यानंतर महापालिकेला जाग आली आणि त्यांनी पोलिसांच्या मदतीने फलक हटवला. त्यामुळे महापालिकेच्या कारभाराबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
फलक काढा म्हणून पोलिसांनीच कळवले
आलेल्या तक्रार अर्जाची दखल घेऊन फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उदयसिंह पाटील यांनी चौक परिसरास भेट देऊन पाहणी केली. तडीपार व्यक्ती सचिन उर्फ बॉबी शिंदे याच्या टोपण नावानेच बॉबी चौक नाव असलेला फलक दिसून आला. तेथे तीन रस्ते असताना चौक म्हणणे चुकीचे आहे. त्या परिसरात त्या व्यक्तीची दहशत निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच महापालिकेच्या कारभारावरील जनतेचा विश्वास उडण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन तडीपार व्यक्तीच्या नावाने असलेल्या चौकाचे नामकरण रद्द करावे आणि रस्त्यावरील फलकाचे अतिक्रमण काढावे, असे पत्र फौजदार चावडी पोलिसांनी ६ मे रोजी पालिका आयुक्तांना दिले. त्यानुसार पोलिस आणि महापालिका यांनी संयुक्त कारवाई करत शुक्रवारी ते अतिक्रमण काढले. याबाबत अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे अरुण सोनटक्के यांना विचारले असता, पोलिसांकडून पत्र आल्याने ते अतिक्रमण म्हणून काढले, असे सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.