आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात सोमवारपासून सुरू झालेल्या राज्यस्तरीय सामाजिक, सांस्कृतिक उत्कर्ष महोत्सवात मंगळवारी पोवाडा, भजन, भारुड या लोकगीतांबरोबरच भारतीय लोकवाद्य आणि संकल्पना नृत्याचे जोरदार सादरीकरण झाले. संपूर्ण राज्यभरातील विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक केलेल्या सरस सादरीकरणाला रसिक-प्रेक्षकांनी देखील उत्स्फूर्त दाद दिली.
शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातील राष्ट्रीय सेवा योजना कक्ष आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने उत्कर्ष राज्यस्तरीय सामाजिक व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी शोभायात्रा आणि उद्घाटन सोहळ्याने या महोत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. मंगळवारी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, कुलसचिव योगिनी घारे यांच्या हस्ते परीक्षकांचा सत्कार करून कार्यक्रमाला सुरुवात केली.
मुख्य रंगमंचावर सकाळी भारतीय लोककलेचा जागर करणाऱ्या पोवाडा, भारुड आणि भजन कार्यक्रमास सुरुवात झाली. यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूरच्या संघाने अतिशय जोरदारपणे पोवाड्याचे सादरीकरण करून शिवभक्तीचा जागर केला. भजन आणि भारुड सादरीकरणाने देखील रसिक-श्रोते चिंब झाले.
सामाजिक शास्त्र संकुलात कार्यप्रसिद्धी अहवाल प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यामध्ये राज्यातील सर्व विद्यापीठांनी एनएसएसच्या माध्यमातून केलेल्या कार्याचे अहवाल प्रदर्शन केले. परीक्षकांनी त्याचे मूल्यमापन केले. दुपारी बारा ते दोन यावेळेत मुख्य रंगमंचावर भारतीय लोकवाद्याचे सदाबहार सादरीकरण झाले. सहभागी सर्व तेरा विद्यापीठांनी यामध्ये सहभागी होत हलगी, डमरू, ढोलकी, ताल, पिपाणी आदी वाद्यांचे सादरीकरण करत विद्यापीठ कॅम्पस दणाणून सोडले. सायंकाळी पाच वाजता कवितेचे सादरीकरण झाले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थिनीनेदेखील तोडीस तोड संकल्प नृत्य सादर करीत मुली वाचवा देश वाचवा, स्त्री अत्याचार, स्त्रीभ्रूण हत्या थांबवा असा संदेश दिला. उत्कर्ष राज्यस्तरीय महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी दुपारी संकल्पना नृत्याचा कार्यक्रम अतिशय जल्लोषात पार पडला. यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची विद्यार्थिनींने अतिशय सुंदर असे लावणी नृत्य सादर करून रसिक-प्रेक्षकांची मने जिंकली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.