आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:पंढरीत यंदा होणार कार्तिकी एकादशीचा सोहळा, वारकऱ्यांत आनंद

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दिवाळीच्या मुळा लेकी आसावली, पाहातसे वाटुली पंढरीची... अर्थात माहेराला जाण्यासाठी दिवाळीच्या सणाची संसारी मुलीला वाट पहावी लागते. त्याप्रमाणे विठ्ठला, तू माझे माहेर आहेस, पंढरीला येण्यासाठी मी नितांत वाट पाहतो आहे...

गेल्या वेळी काेरोना संसर्गामुळे मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत दोन आषाढी एकादशी व एक कार्तिकी एकादशी सोहळा झाला होता. पण कोरोनाचा संसर्ग घटल्यानंतर शासनाने संपूर्ण निर्बंध शिथिल केले आहेत. यामुळे यंदा पूर्वीप्रमाणे कार्तिकी एकादशीचा सोहळा होणार आहे. त्याबाबत बुधवारी जिल्हा प्रशासनाकडून आदेश काढण्यात येणार असल्याचे संकेत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत. कोरोनाचे निर्बंध हटवल्यानंतर राज्यात होणारी ही पहिलीच यात्रा असेल.

मंदिर समितीच्या सदस्यांनी विठ्ठल मंदिर दर्शनासाठी पूर्णपणे खुले करावे, कार्तिकी यात्रेत कोणतेही निर्बंध न ठेवता यात्रा पूर्वीप्रमाणे व्हावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी शंभरकर यांनीही सकारात्मक राहून निर्णय कोणतेही निर्बंध ठेवण्यात येणार नाहीत. भाविकांनी कोरोनाचे नियम पाळावेत, यासाठी अधिक भर राहणार आहे. मास्क वापरणे बंधनकारक राहणार आहे. शिवाय एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही, याची दक्षता घेण्यात येणार आहे. याबाबत बुधवारी जिल्हा प्रशासनाकडून आदेश काढण्यात येणार आहेत. कार्तिक यात्रा पूर्व नियोजनाबाबत जिल्हा नियोजन भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, अतिरिक्त पोलिस अधीक्षक हिंमत जाधव, प्रांताधिकारी गजानन गुरव, उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम आदींची उपस्थिती होती.

पिण्याचे स्वच्छ पाणी, साथरोगांचे आव्हान पेलण्यासाठी फवारणी
कार्तिकी एकादशीच्या सोहळ्याला परवानगी मिळाल्यानंतर पंढरीत येणारे वारकरी, गर्दी आणि सोबत साथरोगांचे आव्हान पेलावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर नगरपालिका प्रशासनाने स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, तात्पुरती शौचालये, प्रदक्षिणा मार्गावरील रस्ते दुरुस्ती, डेंग्यू, मलेरिया या साथीच्या रोगांच्या अनुषंगाने फवारणी, पार्किंग व्यवस्था, ६५ एकर व नदी पात्रातील वाळवंट स्वच्छता व सुविधेबाबतचा आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना केल्या. स्थानिक आरोग्य विभागाने मुबलक प्रमाणात औषधसाठा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तपासणी व उपचारासाठी आवश्यक सुविधा, बेडची उपलब्धता, ऑक्सिजन पुरवठा कोविड केअर सेंटरची उपलब्धता याबाबतचाही आढावा घेतला.

बातम्या आणखी आहेत...