आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यस्तरीय खो - खो स्पर्धा:महिला गटात उस्मानाबाद, नाशिक, ठाणे, पुणे संघात होणार उपांत्य लढत

सोलापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोहोळ येथे सुरू असलेल्या खो-खो स्पर्धेत महिला गटात उस्मानाबाद नाशिक, ठाणे, पुणे उपांत्य फेरीत पोहचले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

रा. फ.नाईक खो-खो संघ ठाणे विरुद्ध राजमाता जिजाऊ संघ पुणे आणि छत्रपती व्यायाम प्रसारक मंडळ उस्मानाबाद विरुद्ध संस्कृती क्लब नाशिक असे महिला गटाचे उपांत्य सामने होणार आहेत.

आमदार यशवंत माने यांनी महाराष्ट्र खो खो असोसिएशन व सोलापूर अ‌ॅम्युचर खो - खो असोसिएशन यांच्या मान्यतेने व न्यू स्पोर्ट्स अकॅडमी संचलित न्यू सोलापूर खो खो क्लबच्या सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन केले आहे.

मोहोळ येथील नागनाथ विद्यालयाच्या मैदानावर सुरू झालेल्या या स्पर्धेत पुरुष गटात शिरसेकर महात्मा गांधी स्पोर्ट्स अकादमी मुंबई उपनगर विरुद्ध एकलव्य क्रीडा मंडळ अहमदनगर, लोटस स्पोर्ट्स क्लब सांगली विरुद्ध राणाप्रताप तरुण मंडळ कुपवाड, नवमहाराष्ट्र संघ पुणे विरुद्ध शेवगाव स्पोर्ट्स क्लब अहमदनगर, विहंग क्रीडा मंडळ ठाणे विरुद्ध छत्रपती व्यायाम प्रसारक मंडळ उस्मानाबाद असे उपउपांत्य फेरीचे सामने होतील.

सोलापूरचे कोणतेही संघ बाद फेरीत पोहचू शकले नाहीत. परंतु 'ड' गटात सह्याद्री संघ मुंबई उपनगर, उत्कर्ष क्रीडा मंडळ सोलापूर व शेवगाव स्पोर्ट्स क्लब अहमदनगर या तिघांचे समान गुण झाले होते. त्यामुळे चिठ्ठी काढलेला सह्याद्री संघ बाद फेरीत पोचला. त्यानंतर उत्कर्ष व शेवगाव यात झालेल्या सामन्यात शेवगावने बाजी मारीत बाद फेरीत प्रवेश केला.

बुधवारी सकाळी झालेल्या महिलांच्या शेवटच्या साखळी सामन्यात संपदा मोरेच्या (२.३०मिनिटे व ४गुण) अष्टपैलू खेळामुळे छत्रपती व्यायाम प्रसारक मंडळ उस्मानाबादने पुण्याच्या राजमाता जिजाऊ संघावर ११-१० अशी १ गुण व १.३०मिनिटे राखून निसटती मात केली. मध्यंतराची ६-५ ही एका गुणाची आघाडीच त्यांना विजय मिळवून दिली. पुण्याच्या प्रियांका इंगळे (१.२०,१.४०मिनिटे व ५ गुण) हिची अष्टपैलू खेळी अपुरी पडली. अन्य सर्व सामने एकतर्फी झाले.

बातम्या आणखी आहेत...