आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुरुष गटात मुंबई उपनगरच्या शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पोर्ट्स क्लब तर महिला गटात पुण्याच्या राजमाता जिजाऊ संघाने राज्य निमंत्रित पुरुष व महिला खो - खो स्पर्धेची विजयी सलामी दिली. या स्पर्धेचे उद्घाटन माजी मंत्री अदिती तटकरे यांनी केले.
यावेळी बळीराम साठे, राजन पाटील, महेश कोठे, महेश गादेकर, अजिंक्यराणा पाटील या मान्यवरांसह भारतीय खो खो महासंघाचे सहसचिव डॉ. चंद्रजीत जाधव, राज्य खो खो संघटनेचे सचिव गोविंद शर्मा, निरीक्षक संदीप तावडे आदी उपस्थितीत होते. आमदार माने यांनी प्रास्ताविक केले. स्पर्धा सचिव संतोष कदम यांनी आभार मानले. यावेळी क्रीडाप्रेमी प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि खेळाडूंना उत्तेजन देत होते.
मोहोळ येथील नागनाथ विद्यालयाच्या मैदानावर सुरू झालेल्या या स्पर्धेत सलामीच्या सामन्यात हर्षद हातनकरच्या अष्टपैलू खेळामुळे शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पोर्ट्स क्लबने वेळापूर ( सोलापूर) येथील अर्धनारी नटेश्वर क्रीडा मंडळावर 14-9 असा एक डावाने विजय मिळविला. वेळापूरकडून गणेश बोरकरने (1 मिनिट व 3 गुण) लढत दिली.
महिला गटात मध्यंतराच्या 5-5 अश्या बरोबरीनंतर पुण्याचा राजमाता जिजाऊ संघाने कडव्या लढतीत वाडीकुरोलीच्या (सोलापूर) कल्याणराव काळे स्पोर्ट्स क्लबला 11.10 असे केवळ एका गुणाने हरविले. पुण्याची प्रियांका इंगळे (2.10 मिनिटे व 5 गुण) ही त्यांच्या विजयाची शिल्पकार ठरली. वाडीकुरोलीच्या प्रिती काळे ( 1.30 व 2.10 मिनिटे) व साक्षी काळे (3 गुण) यांचे प्रयत्न अपुरे पडले.
खो - खो चे आधारस्तंभ खासदार शरदचंद्र पवार यांचा वाढदिवस खो- खो दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त या स्पर्धेचे आयोजन आमदार यशवंत माने यांनी महाराष्ट्र खो - खो असोसिएशन व सोलापूर अॅम्युचर खो - खो असोसिएशन यांच्या मान्यतेने व न्यू स्पोर्ट्स अकॅडमी संचलित न्यू सोलापूर खो - खो क्लबच्या सहकार्याने केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.