आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांस्कृतिक कार्य संचालनालय:संत भावंडांच्या महोत्सवानिमित्त आळंदी येथे ‘ज्ञानियांचा राजा ; सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे कार्यक्रम

सोलापूर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने राज्य शासनातर्फे विविध कार्यक्रम आयोजिले आहेत. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७२५ व्या संजीवन समाधी वर्षांचे आैचित्य, संत निवृत्तीनाथ, संत सोपादनदेव आणि संत मुक्ताई यांच्या ७२५ व्या निर्वाण वर्षानिमित्ताने आळंदीच्या संत भगवानबाबा मंगल कार्यालय येथे दोन दिवसीय कार्यक्रम सुरू आहेत. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी कार्यक्रम आयोजिले असून, रविवारी (दि. १९) सांगता होणार आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे संत ज्ञानेश्वर, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव आणि संत मुक्ताई यांच्या समाधी वर्षानिमित्त त्यांच्या जीवन कार्यावर आधारित ‘ज्ञानियांचा राजा’ हा कार्यक्रम आयोजिला आहे. आळंदीच्या श्री संत भगवानबाबा मंगल कार्यालयात कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध गायिका कार्तिकी गायकवाड, कौस्तुभ गायकवाड हे कला सादर करणार आहेत. दररोज हरिपाठ, व्याख्यान, कीर्तन, भजन, अभंगवाणी, भक्तिगीते, भारूड, दिंडी इत्यादी कलांचा अाविष्कार या कार्यक्रमात होईल. शनिवारी (दि.१८) हरिपाठ कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव, संत मुक्ताई यांच्या जीवनावर आधारित व्याख्यान सादर होईल. अक्षय महाराज भोसले कीर्तन सादर करणार आहेत. रविवारी (दि. १९) दुपारी चार वाजता संत साहित्याचे अभ्यासक स्वामीराज भिसे यांचे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जीवनावर व्याख्यान होईल. संत ज्ञानेश्वर, त्यांच्या भावंडांवर आधारित समर्थ पाटील भजन सादर करणार आहेत. प्रमोद जगताप यांचे कीर्तन होईल. माउलींच्या काव्यावर आधारित ओडिसी नृत्य शुभदा दादरकर आणि सहकारी सादर करणार आहेत. तसेच, भूपाळी ते भैरवी कलामंच ही संस्था गण, गौळण, नमन, भूमाळी, ओवी, वासुदेव, दिंडी, कीर्तन, भारूड, पसायदान सादर करणार आहेत. आळंदी येथे आयोजिलेल्या ज्ञानियांचा राजा कार्यक्रमात सहभागी कलाकारांचा कलाविष्कार, प्रबोधनाद्वारे संतांच्या पुरोगामी विचारांचा जागर करण्यात येईल. या कार्यक्रमांसह सर्व भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...