आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहिला प्रीमियर लीगमधील पहिल्याच गुजरात जायन्ट्स विरुद्धच्या सामन्यात तडफदार अर्धशतक झळकाविणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील मिरे, श्रीपूर येथील किरण नवगिरेला यूपी वॉरियर्सने ३० लाखांत खरेदी केले आहे. पुरस्कर्ते मिळाले नाही म्हणून धोनीचे नाव आपल्या क्रिकेट बॅटवर ‘MSD 07’ असे शॉर्ट फॉर्ममध्ये लिहिले. तिने परिधान केलेल्या टी-शर्टवर सात नंबर असल्यामुळे त्यावर ‘07’ असे नमूद आहे. इन्स्टाग्रामवरही तिने धोनीचा फोटो ठेवला आहे. ४७०० च्यावर तिचे फॉलोअर्स आहेत.
याअगोदर प्रथम श्रेणीच्या इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय महिला टी-२० क्रिकेट संघात तिची निवड झाली होती. महिला प्रीमियर लीगमधील पहिल्याच सामन्यात ४३ चेंडूत ५३ धावा फटकाविल्या. यात पाच चौकार व दोन षटकारांचा समावेश आहे. तिला आता सूर गवसला आहे. अनघा देशपांडे नंतर भारतात गाजत असलेली सोलापूर जिल्ह्यातील ही दुसरी महिला खेळाडू.
संधीचे सोने करायचे ‘दिव्य मराठी’शी बोलताना किरण म्हणते, “धोनीची २०११ मधील कामगिरी पाहिल्यावरच मी क्रिकेटची सुरुवात केली. पुणे येथील आयपीएल स्पर्धेसाठी, प्रथम श्रेणीच्या इंग्लंड दौऱ्यासाठी आणि आता महिला प्रीमियर लीगसाठी निवड. माझ्यासाठी या प्रोत्साहन देणाऱ्या घटना आहेत. एवढ्या मोठ्या स्पर्धा खेळण्याची संधी मिळत आहे त्यामुळे छान वाटते. या संधीचे सोने करायचे आहे. याचे सर्व श्रेय माझ्या आई-वडिलांना जाते. त्यांनी मला प्रोत्साहन दिले नसते, तर मला हा क्षण पाहायला मिळाला नसता. प्रशिक्षक गुलजार शेख पुण्यात आझम कॅम्पसमध्ये सराव घेतात.’
झटपट धावा करणारी पहिली महिला क्रिकेटर किरणने महाराष्ट्राच्या महिला रणजी क्रिकेट संघात २०१७ व २०१८ मध्ये स्थान मिळविले होते. बारामती येथे २०२० मध्ये झालेल्या ऑल इंडिया वुमेन्स टी-२० क्रिकेट स्पर्धेत तिने ८४ चेंडूत २०९ धावा फटकावल्या. यामध्ये १७ षटकार व २३ चौकारांचा समावेश आहे. गतवर्षी टी-२० सामन्यात वेलोसिटीकडून खेळताना तिने ट्रेल ब्लेजर्स विरुद्ध २५ चेंडूत अर्धशतक झळकावले होते. एवढ्या गतीने झटपट धावा करणारी भारतातील पहिली महिला खेळाडू आहे.
मैदानी खेळांकडून क्रिकेटच्या मैदानाकडे तिचे वडील प्रभू नवगिरे हे श्रीपूरच्या पांडुरंग कारखान्यात मजुरी करायचे. किरण हिने प्राथमिक शिक्षण मिरे येथेच घेतले. माध्यमिक शिक्षणासाठी श्रीपूर येथील चंद्रशेखर विद्यालयात प्रवेश घेतला. मिरे ते श्रीपूर हे पाच किलोमीटरचे अंतर किरण चालत जायची. खेळांमधील तिची रुची पाहून शिक्षकांनी वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांमध्ये संधी द्यायला सुरुवात केली. किरणचा शिक्षणाचा वाढता खर्च पाहता तिला शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. तिचा धाकटा भाऊ राजनारायण याने शाळा सोडली. तो मजुरीला जाऊ लागला. बहिणीच्या शिक्षणासाठी आर्थिक हातभार लावू लागला. नवगिरे कुटुंबीयांनी किरण हिला चांगले शिक्षण दिले. किरणने राज्यशास्त्रात एम. ए. केले. शिक्षण पूर्ण करत असतानाच ती भालाफेक, गोळाफेक, १०० मीटर आणि ४०० मीटर धावणे या क्रीडा प्रकारात राज्य व राष्ट्रीय पातळीवर नावलौकिकास येऊ लागली. विद्यापीठ स्पर्धेत भालाफेकीत सुवर्ण जिंकले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.