आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापुरात शहर काँग्रेस आक्रमक:कोश्यारी चले जाव म्हणत केले आंदोलन; राज्यपालांच्या वक्तव्याच्या निषेध करत घोषणाबाजी

सोलापूर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपतींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. अशातच कोश्यारी चले जाव म्हणत, सोलापुरात शहर काँग्रेसच्या वतीने मंगळवारी निषेध आंदोलन करण्यात आले. भाजपाने माफी मागावी अशी मागणी देखील त्यावेळी करण्यात आली.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी दोघांचीही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलची केलेली वक्तव्ये निंदनीय आणि संतापजनक आहेत. या दोघांचा निषेध करण्यासाठी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या नेतृत्वाखाली पांजरापोळ चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मानवी साखळी करुन निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी निषेधाच्या जोरजोरात घोषणाबाजीने परिषर दणाणुन गेला.

काय म्हणाले प्रकाश वाले?

यावेळी बोलताना प्रकाश वाले म्हणाले की, निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस आणि भाजपा नेते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने मत मागतात आणि सत्तेत बसून बसून सतत अपमान करतात भाजपच्याच बगलबच्चे असलेले भाज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसेच भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज बद्दल अवमानकारक वक्तव्य केले आहे. सत्तेची गुर्मी चढलेल्या राज्यपाल कोश्यारी व भाजपा नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना भाजपाच्या नेत्यांशी करण्याचे पाप त्यांनी केले आहे.

या आधीही राज्यपाल होते चर्चेत

या अगोदर ही सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल ही अपशब्द वापरले होते. उठसुठ सतत बाष्फळ बड़बड़ करणारे भाजपचा नेते निषेध करत नाही सगळे बिळात लपून बसले आहेत. छत्रपतींचा अपमान भाजपला मान्य आहे का? या वादग्रस्त वक्तव्यामुळे महाराष्ट्राचा स्वाभिमान दुखावला गेला असून महाराष्ट्रातील जनता छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान खपवून घेणार नाही. अश्या वादग्रस्त राज्यपालांची तात्काळ हकालपट्टी करा तसेच शिवाजी महाराजांबद्दल भाजपाचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनेही अकलेचे तारे तोडले आहेत त्याबद्दल भाजपाने जाहीर माफी मागावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी प्रकाश वाले यांनी दिला. यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते, महिला आघाडी युवक काँग्रेस आणि सर्व सेलच्या पदाधिकाऱ्यांनी भाषणे केली.

बातम्या आणखी आहेत...