आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई उच्च न्यायालयात याचिका:लक्ष्मीचा परवाना मुदतीपूर्वीच रद्द, रूपीला 29 वेळा मुदत

साेलापूर / श्रीनिवास दासरी9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लक्ष्मी सहकारी बँकेची आर्थिक स्थिती सुधारण्याच्या अटीवर बँकिंग परवान्याला १२ ऑक्टाेबर २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले हाेते. तसा आदेशही गेल्या महिन्यातच काढला हाेता. परंतु मुदत संपण्यापूर्वीच परवाना रद्द केला. मुंबईच्या रूपी बँकेला मात्र रिझर्व्ह बँकेने एक-दाेनदा नव्हे, तर तब्बल २९ वेळा मुदतवाढ दिली हाेती. शेवटी ८ ऑगस्ट २०२२ राेजी त्याचाही परवाना रद्द केला. परंतु बँकेच्या प्रशासकांनी रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाविराेधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. १७ ऑक्टाेबरपर्यंत स्थगिती मिळाली.

या पार्श्वभूमीवर लक्ष्मी बँकेसंदर्भातही रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करावी लागेल. कारण, या बँकेच्या विलिनीकरणाचे प्रयत्न पूर्णत्वास येत असतानाच रिझर्व्ह बँकेने परवाना रद्द केला. पुणे पीपल्स काे- ऑपरेटिव्ह बँकेने लक्ष्मी बँकेच्या कर्ज प्रकरणांची माहिती घेतली. स्वमालकीच्या शाखांचे मूल्यांकन केले. त्यानंतर संचालकांनी लवकरच विलिनीकरण प्रक्रिया पूर्ण करण्याचे सूचित केले हाेते. हीच बाब घेऊन न्यायालयात जावे लागेल.

ठेवीदार, ग्राहक यांनाच घ्यावा लागेल पुढाकार
रूपी बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष सुधीर पंडित हे शासकीय सदस्य आहेत. त्यामुळे त्यांनी न्यायालयीन लढाई सुरू केली. लक्ष्मी बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष नागनाथ कंजेरी हे सहकार खात्याचे शहर उपनिबंधक आहेत. आरबीआयने बँकिंग परवाना गुरुवारी रद्द केल्यानंतर सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी श्री. कंजेरी यांचीच अवसायक (लिक्विडेटर) म्हणून नियुक्तीचा आदेश काढला. त्यामुळे त्यांना न्यायालयात जाता येणार नाही. बँकेचे हितचिंतक, ग्राहक, कर्जदार अथवा ठेवीदार यांच्यापैकी कोणीही न्यायालयात जाऊ शकतील. तत्पूर्वी केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडे रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाविरोधात अपील दाखल करावे लागेल. रूपी बँकेसंदर्भात निर्णय देताना न्यायमूर्ती संदीप शिंदे म्हणाले, की रिझर्व्ह बँकेच्या आदेशात हस्तक्षेप करणार नाही. परंतु प्रकरण केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडे अपिलात असल्याने नैसर्गिक न्यायतत्त्वानुसार १७ ऑक्टोबरपर्यंत स्थगिती देत आहे.