आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावेंगुर्ला (महाराष्ट्र) येथील समुद्रकिनारी भागात तेरे-खोल खाडीसमोरील खोल पाण्यात लेदर बॅक कासवाची आणखी एक छायाचित्रीत नोंद मे महिन्यात झाली आहे. सहायक मत्स्यविकास अधिकारी, वेंगुर्ला व रूपेश म्हाकले आणि त्यांचे सहकारी यांनी कांदळवन प्रतिष्ठानला पुरवलेल्या चित्रफितीनुसार ही माहिती मिळाली आहे. महाराष्ट्रातून तिसरी छायाचित्रित नोंद आहे.
वन विभाग व मत्स्यव्यवसाय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने २०१८ पासून सुरू असलेल्या मच्छीमारांसाठी नुकसान भरपाई योजनेंतर्गत ही नोंद झाली आहे. यापूर्वी १९८५ साली देवबाग, मालवण किनाऱ्यावरून साडेचार फूट लांब असे लेदर बॅक कासव मिळाल्याची केंद्रीय सागरी मत्स्य संशोधन संस्था (CMFRI) या संस्थेने नमूद केले होते. त्यानंतर तब्बल चौतीस वर्षांनी मे २०१९ रोजी रायगड जिल्ह्यातील भरडखोल मधून पहिल्यांदा व मार्च २०२१ मध्ये डहाणूतील नारपाडा भागातून दुसऱ्यांदा या दुर्मिळ कासवाच्या प्रजातीची छायाचित्रित नोंद नुकसान भरपाई योजनेअंतर्गत झालेली होती. याअंतर्गत मागील काही वर्षांमध्ये १६१ ऑलिव्ह रिडले कासवे, ७४ ग्रीन सी कासवे, ५ हॉक्सबिल कासवे व २ लेदर बॅक कासवे मच्छीमारांनी त्यांच्या जाळ्यातून सोडली असून त्याकरिता त्यांना सुमारे ३३ लाख ५८ हजार ३५० रुपयांचे एवढे अनुदान प्राप्त झाले आहे.
असा आहे लेदर बॅक कासव..
लेदर बॅक कासव हे मुख्यतः अंदमान व निकोबार बेटांवर त्यांची घरटी करतात. या कासवांची उंची साधारण ५ ते ७ फूट एवढी असून जगातील सर्वात मोठी कासवाची प्रजात म्हणून ओळखली जाते. ही कासवे मुख्यतः जेलीफिश या समुद्री जीवांवर आपला उदरनिर्वाह करतात. त्यासाठी लांब स्थलांतरदेखील करतात. भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा (परिशिष्ट I भाग २) याच्या अंतर्गत सर्व समुद्री कासवांना अत्यंत कडक संरक्षण देण्यात आले आहे. जागतिक पातळीवरही सागरी कासवाची ही विशिष्ट प्रजाती आंतरराष्ट्रीय प्रकृती संरक्षण संघाच्या (IUCN) धोक्यात असलेल्या प्रजातींच्या लाल यादीमध्ये असुरक्षित म्हणून सूचिबद्ध आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.