आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खळबळ उडाली:पटवर्धन कुरोलीत बिबट्यासदृश प्राणी दिसला ;गावकऱ्यांत घबराट वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देत पाऊल खुणांचे ठसे घेतले

पंढरपूर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील पटवर्धन कुरोली व देवडे परिसरात मंगळवारी रात्री बिबट्यासदृश प्राणी दिसल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्राण्याच्या पावलांचे ठसे घेतले आहेत. प्राथमिक अंदाजावरून हे ठसे बिबट्यासारख्या प्राण्यांचे आहेत. त्यामुळे पटवर्धन कुरोली, देवडे परिसरात खळबळ उडाली आहे. मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास देवडे ता. पंढरपूर येथील पांडुरंग गायकवाड यांना राहुल सोनटक्के हा दवाखान्यात घेऊन जात होता. त्यावेळी शेवतेच्या बाजूने पटवर्धन कुरोली नदीपात्राकडे हा बिबट्यासदृश प्राणी रस्ता ओलांडून जाताना दिसला. त्यानंतर त्यांनी आजूबाजूच्या वस्तीवरील शेतकऱ्यांना फोन करून ही माहिती दिली. यानंतर शेतकऱ्यांनी रात्रभर गस्त घालत जनावरे, घरांना पहारा दिला.

बुधवारी सकाळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिल्यानंतर वन विभागाचे वनमजूर दिलखुश मुलाणी यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह हा प्राणी आढळलेल्या परिसराची पाहणी केली. शेताच्या परिसरात आढळलेले ठसेही घेतले. हे ठसे बिबट्यासदृश प्राण्याचे असल्याचे त्यांनी नागरिकांना सांगितल्याचे नागेश उपासे यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांनी येत्या काही दिवसांत खबरदारी घेऊन रात्री एकटे न फिरण्याचा सल्ला त्यांनी दिला. रात्री अचानक हा प्राणी आढळल्याने नागरिक सजग झाले आहेत.

नागरिकांनी सजग राहावे
नागरिकांच्या तक्रारीनंतर त्या परिसरात जाऊन पाहणी करून त्या प्राण्याचे ठसे घेतले आहेत. ते ठसे वरिष्ठ वन अधिकाऱ्यांकडे पाहणीसाठी पाठविले आहेत. त्यानंतर तो कोणता प्राणी आहे, हे निश्चित होईल. मात्र सध्या आम्ही परिसरातील नागरिकांना आपली घरे, जनावरे यांचे संरक्षण करत सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दिलखुश मुलाणी, वनमजूर, पंढरपूर वन विभाग

बातम्या आणखी आहेत...