आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्लक्ष:नाविंदगीत बछड्यासह बिबट्या, फोटोत स्पष्ट दिसतानाही वनखाते म्हणते बिबट्यासदृश प्राणी

अक्कलकोट4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाविंदगी येथील एका शेतातील केळीच्या बागेत शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास बछड्यासह बिबट्या आढळला. त्याचे छायाचित्रही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. नागरिक हा प्राणी बिबट्या असल्याचे म्हणत असलेतरी वन विभागाने मात्र बिबट्यासदृश्य प्राणी असल्याचे म्हटले आहे. तसेच न घाबरता सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

गौडगाव रस्त्यावर नाविंदगी गावापासून एक किलोमीटर अंतरावर स्वामी यांची शेती आहे. त्यांचा शेतगडी सचिन स्वामी हा वीज आल्यानंतर पाणी देण्यासाठी केळीच्या बागेत गेला. तेथे त्याला बछड्यासह एक मादी बिबट्यासदृश्य प्राणी दिसला. त्यांनी शेजारी राजेंद्र गौडगाव, मिलिंद पाटील यांना सांगितले. त्यांनीही तेथे जाऊन खात्री केली. त्यानंतर ग्रामदैवत प्रभुमल्लेश्वर यात्रेनिमित्त लावलेल्या स्पिकरवरून ग्रामस्थांना त्याची सूचना दिली. ग्रामस्थांनी तेथे जाऊन दीड एकर केळी बागेला चोहोबाजूने पहारा दिला. तसेच वन विभाग व पोलिसांना कळविले. तसेच दुपारी बिबट्याला पाहिल्याचे आणखी एका ग्रामस्थानेही सांगितले. तर वनपाल संदीप मेंगाळ यांनीही एक बिबट्या पाहिल्याचे सांगितले. वन विभागाचे अधिकारी रुकेश कांबळे, संदीप मेंगाळ यांच्यासह कर्मचाऱ्यांनी बिबट्या आढळून आलेल्या परिसराची पाहणी केली. स्वामी यांच्या केळीच्या बागेतील प्राण्याच्या पायाच्या ठशांचीचीही पाहणी केली. ते बिबट्यासदृश्य प्राण्याचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्याला पळवून लावू नका, पकडा - आमदार सचिन कल्याणशेट्टी हेही नाविंदगीत स्वामी यांच्या शेतात पोहोचले. तेथे ते तब्बल चार तास थांबले. त्यांनी वन अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. परिसरात वस्त्या आहेत. बिबट्याला पळवून लावू नका, त्याला पकडा, अशी मागणी ग्रामस्थांनी अक्कलकोटच्या वन अधिकाऱ्यांकडे केली. रात्री उशिरापर्यंत रेस्क्यू पथकासह पोलिस व वन कर्मचारी घटनास्थळी होते.

रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम
सोशल मीडियावरून बिबट्यासदृश्य प्राणी दिसल्याची माहिती मिळाल्यावर ग्रामस्थ सतर्क झाले. तसेच शोधमोहीम सुरू होती. रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध लागला नव्हता. त्याला पकडण्यासाठी सोलापूर व पुणे येथील वन विभागाच्या रेस्क्यू पथकाला पाचारण केले आहे. वनसंरक्षक लक्ष्मण आवारे, वनपरिक्षेत्र अधिकारी दीपक खलाणे, रेस्क्यू पथकाचे प्रभारी वनपाल कुताटे, वनपाल रुकेश कांबळे, संदीप मेंगाळ हे नाविंदगी परिसरात त्याचा शोध घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...