आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन वर्षांपूर्वी घडलेला प्रकार:किशोराचा खून करणाऱ्या युवकास जन्मठेप ; कबुतर खरेदीच्या पैशावरून वाद झाला होता

सोलापूर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नान्नजमधील चौदा वर्षे वयाच्या अमीर नबीसाब मुजावर यास घरातून नेऊन रूमालाने गळा आवळला. डोक्यात दगड घालून त्याचा खून केल्याप्रकरणी एकोणीस वर्षाच्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. पांढरे यांनी ठोठावली. अरबाज अय्युब शेख (वय १९, कामधंदा मजुरी, रा. नान्नज) असे आरोपीचे नाव आहे.

अरबाज याने ११ जानेवारी २०२० रोजी अमीरला घरातून बाहेर बाेलावून नेले. राज बिअर शाॅपीतून दाेन दारूच्या बाटल्या खरेदी केल्या. गावातील शाळेच्या पाठीमागील झाडीत नेऊन दारू पाजली. यानंतर दोघांत वाद झाल्याने त्यास नान्नज ते मार्डी रोडवरील प्रशांत बिचडू यांच्या शेतात नेऊन रूमालाने गळा आवळला. डोक्यात दगड घालून अमीरचा खून केला. त्याचा मोबाइल स्वत:च्या घरी नेला. अमीर घरी न परतल्याने वडलांनी पोलिसांत तक्रार दिली. गावातील नागरिकांच्या मदतीने आरोपीस तालुका पोलिस ठाणे येथे नेले. चौकशीत खून केेल्याचा गुन्हा आरोपीने कबूल केला. सरकार पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील अॅड. प्रदीपसिंग राजपूत यांनी तर आरोपीतर्फे अॅड. अभिजित इटकर यांनी काम पाहिले. सदर प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक सुहास जगताप, पोलिस उपनिरीक्षक अनिल देवडे यांनी केला. कौर्ट पैरवी म्हणून पोलिस नाईक सुमन वाडे यांनी काम पाहिले. मृताचे शवविच्छेदन अहवाल, डॉक्टरांची साक्ष, न्याय वैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल, घटनास्थळावरील पुरावे, पंचनामा यावरून खून झाल्याचे सिद्ध होते, असा युक्तिवाद सरकारी वकील अॅड. प्रदीपसिंग राजपूत यांनी केला. तो ग्राह्य धरून आरोपीस जन्मठेप शिक्षा ठोठावण्यात आली. सरकारपक्षातर्फे १९ साक्षीदार तपासण्यात आले. दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास शिक्षा, मृताच्या वारसांना नुकसान भरपाई म्हणून पन्नास हजार रुपये आरोपीने द्यावेत, असा आदेश न्यायालयाने दिला.

बातम्या आणखी आहेत...