आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रौर्याची परिसीमा:पत्नीशी प्रेमसंबंध : पोलिसाने अकलूजच्या तरुणाचा मुंबईत केला खून, शिर धडावेगळे

सोलापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पत्नीशी असलेल्या विवाहबाह्य संबंधांमुळे मुंबईत पाेलिस शिपाई असलेल्या संशयित आराेपी शिवशंकर गायकवाड याने अकलूजमधील भाजीपाला विक्रेते अर्जुन ऊर्फ दादा जगदाळे याचा धडापासून शीर वेगळे करून खून केला. मृतदेहाची ओळख दहा दिवस पटवता आली नाही. मुंबई गुन्हे शाखेच्या (युनिट चार) पाेलिसांनी मृत दादाच्या डाव्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करून त्याच्याखाली बसवलेल्या प्लेटद्वारे तपास लावला. प्लेट काेणत्या कंपनीची आहे, हे शोधत त्या माहितीच्या आधारे अकलूजमधील ऑर्थोपेडिक रुग्णालयापर्यंत पोलिस पोहोचले. त्यांनी प्लेट कोणाला बसवली याची माहिती पत्त्यासह माहिती दिली. त्याद्वारे पोलिस मृताच्या अकलूज येथील घरापर्यंत पाेहाेचले. हातावर गोंदलेल्या ‘दादा’ या टॅटूमुळे घरच्यांना मृताची ओळख पटली.

दादा जगदाळे (वय ३५ रा. अकलूज, जि. सोलापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. ३० सप्टेंबर रोजी शीर वेगळे केलेले जगदाळे याचे धड अँटाप हिल येथील सीजीएसटी क्वार्टरच्या बाहेर आढळले होते. पोलिस शिपाई शिवशंकर गायकवाड (वय ४५), पत्नी मोनाली गायकवाड (वय ३५ रा. वरळी, मुंबई) या दोघांना मागील शनिवारी १० ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली असून सध्या ते २२ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत आहेत. खून करून पुरावे नष्ट केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. ३० सप्टेंबर रोजी मंुबईच्या अँटॉप हिल परिसरात एका तरुणाचा शीर नसलेला मृतदेह सापडला हाेता. सायन विभागाच्या सहायक पोलिस आयुक्त अश्विनी पाटील यांच्या वाहनावर चालक म्हणून काम करणाऱ्या शिवशंकर गायकवाड याने हा खून केल्याचे निष्पन्न झाले. पाेलिस शिपायाच्या पत्नीचे मृत तरुणाशी प्रेमसंबंध होते. त्यातून हा प्रकार घडल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. खुनात वापरलेले हत्यार, सीमकार्ड नसलेले मोबाइल पोलिसांनी वरळी येथील गटारीतून जप्त केले. रक्ताचे नमुने पोलिसांनी वरळी पोलिस क्वार्टरमधील आरोपीच्या घरातून घेतले. शिवशंकर याच्यावर वरळी येथे विनयभंगाचा आणि अकलूज पोलिस ठाण्यात हुंड्यासाठी छळ केल्याचे गुन्हे यापूर्वीच दाखल झालेले आहेत.

तांत्रिक मुद्याच्या आधारे शोधले धागेदोरे : अँटॉप हिल पोलिस व गुन्हे शाखेचे (युनिट चार) पथक संयुक्तपणे तपास करीत होते. शवविच्छेदन अहवालात त्याच्या गुडघ्याच्याखाली प्लेट बसविल्याची माहिती समाेर आली.

अशी घडली घटना
दादा जगदाळे व मोनाली गायकवाड या दोघांचे प्रेमसंबंध होते. दादा हा मोनाली यांच्या माहेरचा रहिवासी होता. मोनालीचा विवाह मुंबईच्या शिवशंकर गायकवाड यांच्याबरोबर झाला होता. त्यानंतरही मोनाली व दादा यांचा मोबाइलवरून संवाद सुरू होता. पत्नी मोनाली मोबाइलवरून कोणाशी बोलते याचा संशय शिवशंकरला आला. यावरून त्यांच्यात वाद व्हायचे. शिवशंकरने दादा जगदाळेशी संपर्क साधून त्याला मुंबईला बोलावून घेतले. मुंबईत गेल्यानंतर २९ सप्टेंबर रोजी अॅँटॉप हिल परिसरात त्याचा खून केला व शीर धडावेगळे केले. २९ सप्टेंबरच्या रात्री शिवशंकरने दादाला दारू पाजली. दारूमुळे दादाची शुद्ध हरपल्यानंतर शिवशंकरने त्याच्या पोटात चाकूने वार केले. नंतर त्याच्या शरीराचे तुकडे केले. एका प्लास्टिक बॅगेत हे तुकडे भरून वाहनातून अँटॉप हिल परिसरातील सीजीएसटी क्वार्टरच्या बाहेर फेकले, अशी माहिती मोनालीने दिल्याचे पोलिसांनी सांगितले. शीर कचराकुंडीत टाकून दिले. हाता-पायावर वार केले. ३० सप्टेंबर रोजी अँटॉप हिल पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन केले. मृताच्या हातावर दादा असे गोंदले गेले होते.शिवशंकर हा तपासात सहकार्य करत नसल्याचे तपास अधिकाऱ्यांनी महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर सांगितले. शिवशंकरने सांगितल्यानुसार मानखुर्द डंपिंग ग्राऊंड येथील दोन ठिकाणी दादाच्या मृतदेहाचा शोध घेतला, असेही तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर महानगर दंडाधिकाऱ्यांनी शिवशंकर आणि मोनाली यांना पोलिस कोठडी सुनावली.

बातम्या आणखी आहेत...