आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दक्षिण सोलापूर:महाराष्ट्र केसरी अप्पालाल शेख यांचे निधन, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील कुस्तीचे फड गाजवले

दक्षिण सोलापूर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रकुल स्पर्धेत १९९१ मध्ये सुवर्णपदक व १९९२ मध्ये महाराष्ट्र केसरी विजेते मल्ल अप्पालाल शेकुंबर शेख (७०) यांचे गुरुवारी दीर्घ आजाराने निधन झाले. दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावात जन्मलेल्या अप्पालाल यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील कुस्तीचे फड गाजवले. काही महिन्यांपासून मधुमेह व मूत्रपिंडाच्या विकाराने ते त्रस्त होते. सोलापुरातील रुग्णालयात उपचार सुरू असताना गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास त्यांची प्राणज्याेत मालवली. त्यांच्या पश्चात अस्लम, अश्पाक व गौसपाक ही तीन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. चार महिन्यांपूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. बोरामणी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

घरात तिघे महाराष्ट्र केसरी
अप्पालाल शेख यांचा राज्य सरकारने शिवछत्रपती पुरस्कार देऊन सन्मान केला होता. त्यांचे मोठे बंधू इस्माईल शेख यांनीही महाराष्ट्र केसरी मान मिळवला. या दोन्ही भावांचा कुस्तीतील वारसा पुढे नेत पुतण्या मुन्नालाल शेख यांनीदेखील २००२ मध्ये महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली. बोरामणी येथील एकाच कुटुंबातील तीन-तीन महाराष्ट्र केसरी झाले.

बातम्या आणखी आहेत...