आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअक्कलकोट तालुक्याच्या सीमावर्ती भागातील ११ गावांनी कर्नाटकात जाण्यासाठी निवेदन दिले होते. गावाला जाण्यासाठी पक्के रस्ते नाहीत. त्यामुळे येथील गावकऱ्यांना नदीपलीकडे कर्नाटकात जाऊन १३ किलोमीटर लांब वळसा घालून विजापूर महामार्गाने सोलापूरला यावे लागते, अशी व्यथा ग्रामस्थांनी मांडली.
या वेळी महांतेश हत्तुरे, सिद्धाराम टाकळे, मल्लिकार्जुन कांबळे आदी उपस्थित होते. सुगलाबाई हत्तुरे या सरपंच तर मालन मुल्ला या उपसरपंच आहेत. आळगी, शेगाव, दारसंग, कल्लकर्जाळ, कोर्सेगाव, केगाव बु. हिळ्ळी, शावळ, देवीकवठा, कुडल, आंदेवाडी या सीमावर्ती गावांपासून हाकेच्या अंतरावर कर्नाटक आहे. तेथील डांबरीकरण झालेले रस्ते, मोफत वीज, मुबलक पाणी, अत्यल्प दारत मिळणारे धान्य या सुविधा सीमावर्तीयांना खुणावताहेत.आम्हाला राज्य सरकारकडून सुविधा मिळाल्या नाहीत तर आम्ही कर्नाटकात जाण्याचा प्रश्नच नाही, असे तडवळ भाग रस्ता पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष महांतेश हत्तुरे म्हणाले.
पाणी : उन्हाळ्यात शेतीसाठी सिंचनाची सोय नाही : नदी उशाला कोरड घशाला अशी स्थिती येथे आहे. पावसाळ्यात वरील धरणात ओव्हरफ्लो झालेले पाणी सोडले जाते. मात्र उन्हाळ्यात नदी कोरडी पडते. पिण्याच्या पाण्याचीही समस्या निर्माण होते. त्यामुळे उजनीतून तीन पाळ्यात पाणी सोडण्याची मागणी ग्रामस्थांची आहे. पण आंदोलनानंतर आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी पाच पाळ्यांत पाणी देण्याचे आश्वासन दिले आहे.
आपल्यापेक्षा ७०% सुविधा कर्नाटकात अधिक
नदी ओलांडल्यानंतर पलीकडे रस्ते सुस्थितीत दिसतात. पाणीपट्टी आकारली जात नाही. शेतकऱ्यांना वीज मोफत आहे. त्यामुळे त्या भागातील सुविधा आम्हाला खुणावताहेत. राज्य सरकारने सीमावर्ती गावांचा विकास करावा, अन्यथा आम्हाला कर्नाटकात जाण्याची परवानगी द्यावी. - सिद्धाराम टाकळे, शेतकरी
खराब रस्ते : नागरिकांना जडले मणक्याचे आजार
राज्यातील रस्ते उखडलेले आहेत. अनेकांना मणका-श्वसनाचे आजार जडले आहेत. याउलट कर्नाटकातील रस्ते डांबरी आहेत त्यामुळेच सोलापूरला जाण्यासाठी १३ किमीचा कर्नाटकातून जाणारा मार्ग येथील नागरिक निवडतात.
७० वर्षांपासून दुर्लक्षच
आमच्याकडे ७० वर्षांपासून दुर्लक्ष झाले. दोनदा मतदानावर बहिष्कार टाकूनही काही उपयोग झाला नाही. कर्नाटकात जाण्याचे ठराव केले तर आता लोकप्रतिनिधी लक्ष देत आहेत. - महांतेश हत्तुरे, तडवळ सीमाभाग रस्ते, पाणी संघर्ष समिती
वीज : महाराष्ट्रात आठ तासच, कर्नाटकात शेतीसाठी मोफत
कर्नाटकात शेतीसाठी वीज मोफत आहे. मात्र महाराष्ट्रात ८ तास वीज सोडली जाते. आळगीतील दलित वस्तीमध्ये फक्त विजेचे खांब रोवले आहेत. मात्र त्यावर दिवे बसवलेले नाहीत. सहा महिन्यांपूर्वी रोहित्रासाठी नुसताच खांबांचा सांगाडा उभारला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.